Wed, May 22, 2019 16:19होमपेज › Sangli › इनामदार, सावर्डेकर, कांबळे, मेस्त्री, बारगीर स्वीकृत

इनामदार, सावर्डेकर, कांबळे, मेस्त्री, बारगीर स्वीकृत

Published On: Sep 11 2018 1:41AM | Last Updated: Sep 10 2018 10:19PMसांगली : प्रतिनिधी

अखेर स्वीकृत, स्थायी समिती, महिला बालकल्याण, मागावसर्गीय अर्थात समाजकल्याण समितीच्या निवडीवर सोमवारी महासभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेतील सुत्रे सोपवलेले  भाजप नेते शेखर इनामदार, रणजित सावर्डेकर व आरपीआयचे विवेक कांबळे यांची वर्णी लावण्यात आली. काँग्रेसकडून करीम मेस्त्री व आयुब बारगीर यांना संधी देण्यात आली.महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. 

संख्याबळानुसार पालिकेच्या पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड महासभेत करण्यात आली. यामध्ये भाजपचे तीन तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका नगरसेवकाची निवड करण्यात आली. तीनही पक्षांच्या गटनेत्यांनी त्यांच्या सदस्यांच्या नावाचा बंद लिफाफा महापौर व आयुक्तांकडे दिला. महापौर  खोत यांनी सदस्यांची नावे जाहीर केली. भाजपकडून दोन दिवसांपूर्वीच शेखर इनामदार यांचे नाव निश्चित झाले होते.  उर्वरित दोन जागांसाठी विवेक कांबळे, खासदार संजय पाटील समर्थक रणजित पाटील-सावर्डेकर, अशोक सूर्यवंशी व बाबासाहेब आळतेकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  आरपीआयचे राज्य सचिव  विवेक कांबळे यांना संधी दिली. तर दुसरीकडे खासदार संजय पाटील गटाला संधी देत रणजित पाटील-सावर्डेकर यांची वर्णी लावण्यात आली.

काँग्रेसकडून करीम मेस्त्री यांना संधी देत लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेेवून  निर्णय घेण्यात  आला. मेस्त्री हे काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रभावी वक्ते आहेत. राष्ट्रवादीकडून आयुब बारगीर व सागर घोडके यांच्या नावाची चर्चा होती, पण जयंत पाटील यांनी कष्टकरी कार्यकर्ते म्हणून  बारगीर यांना संधी दिली. 

स्थायी समितीतही  संख्याबळानुसार भाजपचे नऊ, कॉँग्रेसचे चार तर राष्ट्रवादीकडून तीन सदस्यांना संधी मिळाली. तीनही पक्षांनी आपल्या दिग्गज नगरसेवकांना संधी देत जुन्या, अनुभवी व नवीन चेहर्‍यांची निवड केली आहे.   महिला व बाल कल्याण समितीवर 16, मागासवर्गीय व दलित वस्ती सुधार समितीवर 11 सदस्यांची निवड करण्यात आली. 

भाजपचे गटनेते युवराज बावडेकर, काँग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर व राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी त्यांच्या सदस्यांची नावे बंद पाकिटातून महापौर  खोत यांच्याकडे दिली. खोत यांनी या नावांची घोषणा केली. 

स्थायी सभापती अजिंक्य पाटील?

स्थायी समितीवर भाजपकडून वर्णी लागलेल्यांमध्ये भारती दिगडे, पाडुरंग कोरे, अजिंक्य पाटील, संदीप आवटी यांचा समावेश आहे. हे चौघेही सभापती पदासाठी दावेदार आहेत. मात्र माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्य पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. सोमवारी समिती सदस्यांची निवड झाली आहे. पुढील आठवड्यात सभापती निवडीची शक्यता आहे. 

खणभागाला मिळाले सात नगरसेवक

स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपने रणजित पाटील-सावर्डेकर, काँग्रेसने करीम मेस्त्री तर राष्ट्रवादीने आयुब बारगीर यांना संधी दिली. हे तीनही नगरसेवक खणभागातील आहेत. खणभागातून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी महापौर हारूण शिकलगार तर भाजपच्या सुनंदा राऊत, स्वाती शिंदे हे चार जण निवडून आले आहेत. त्यामुळे आता खणभागात नगरसेवकांची संख्या सात झाली आहे. 

स्वीकृत नगरसेवक, समिती सदस्य...

1) स्वीकृत नगरसेवक :  भाजप : शेखर इनामदार, विवेक कांबळे, रणजित पाटील-सावर्डेकर काँग्रेस : करीम मेस्त्री राष्ट्रवादी : आयुब बारगीर

2) स्थायी समिती : भाजप : अजिंक्य पाटील, भारती दिगडे, लक्ष्मण नवलाई, स्वाती शिंदे, संजय कुलकर्णी, प्रकाश ढंग, संदीप आवटी, पांडुरंग कोरे, गणेश माळी. काँग्रेस : वर्षा निंबाळकर, संजय मेंढे, अभिजित भोसले, मनोज सरगर, राष्ट्रवादी: विष्णू माने, रझिया काझी, योगेंद्र थोरात

3) महिला व बालकल्याण समिती- भाजप: अनारकली कुरणे, सुनंदा राऊत, गीता सुतार, गीतांजली सूर्यवंशी, नसीमा नाईक, शांता जाधव, मोहना ठाणेदार, गायत्री कल्लोळी, अस्मिता सरगर. काँग्रेस : रोहिणी पाटील, आरती वळवळे, मदीना बारूदवाले, शुभांगी साळुंखे. राष्ट्रवादी : स्वाती पारधी, सविता मोहिते, पवित्रा केरीपाळे.

4) समाज कल्याण समिती: भाजप: अनिता व्हनखंडे, आनंदा देवमाने, जगन्नाथ ठोकळे, सुब्राव मद्रासी, स्नेहल सावंत, सोनाली सागरे, अप्सरा वायदंडे राष्ट्रवादी : शेडजी मोहिते, सविता मोहिते, योगेंद्र थोरात. काँग्रेस : कांचन कांबळे