होमपेज › Sangli › मराठा आरक्षणासाठी बेमुदत धरणे सुरू

मराठा आरक्षणासाठी बेमुदत धरणे सुरू

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 08 2018 1:51AMसांगली : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी सांगलीत स्टेशन चौकात बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात झाली. अनेक संस्था,संघटना, व्यक्तींनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. दरम्यान, जिल्हाभर दि. 9 ऑगस्ट रोजी बंद, रास्ता रोको, धरणे आंदोलन जोरात होईल, असे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. 

मराठा आरक्षण तातडीने मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे स्टेशन चौकात ज्येष्ठ नेते (स्व.) वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुरू झाले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, नितीन चव्हाण, सतीश साखळकर, रोहित शिंदे, अंकित पाटील, राहुल पाटील, धनंजय वाघ, सुशांत पवार, बाळ सावंत, एम. जे. पाटील, संभाजी पोळ, अजय देशमुख, विजयकुमार दळवी व कार्यकर्ते यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला. 

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. माजी आमदार भगवान साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सामाजिक कार्यकर्ते अश्रफ वांकर, बहुजन क्रांती मोर्चाचे नामदेव करगणे, शाहीन शेख, माजी नगरसेवक विक्रम वाघमोडे, प्रा. विजय पाटील (पुणे), वनिता पटेल, नितू चव्हाण, सीमा जाधव, प्रदीप थोरबोले,  सामाजिक कार्यकर्ते चंदन चव्हाण, माजी नगरसेवक शेखर माने, शिवसेनेचे अनिल शेटे, अमर पडळकर व अनेक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी,  व्यक्तींनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. 

डॉ. पाटील म्हणाले, राज्यात मराठा समाजाच्या वतीने 58 मोर्चे काढण्यात आले. शांततेच्या मार्गाने सुमारे अडीच ते तीन कोटी लोक रस्त्यावर आले. त्यांनी सरकारकडे आरक्षणाची मागणी केली. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. आरक्षणाचा प्रश्‍न रेंगाळत राहिल्याने  समाजातून उद्रेक होत आहे. नैराश्यातून तरुण आत्महत्या  करीत आहेत. मात्र तरूणांनी आत्महत्या करू नये. आक्रमक लढा देऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास भाग पाडू. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दि. 9 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार आंदोलन होईल. बंद, रास्ता रोको, धरणे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलन हिंसक मार्गाने होणार नाही याची दक्षता मराठा समाजबांधवांनी घ्यावी. एस.टी. बस अथवा शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये,  असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.