होमपेज › Sangli › आषाढी एकादशीसाठी ‘मागेल त्या गावात एस.टी.’; 160 जादा गाड्या

आषाढी एकादशीसाठी ‘मागेल त्या गावात एस.टी.’; 160 जादा गाड्या

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 11:44PMसांगली : प्रतिनिधी

पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी  सांगली एस. टी. विभागाने जिल्ह्यात ‘मागेल त्या गावात गाडी’ देण्याची तयारी केली आहे. एकादशी झाल्यानंतर परतताना वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून दि. 24 जुलैरोजी ऑनलाईन बुकिंग सेवा उपलब्ध केल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कदम यांनी दिली. 

सांगली जिल्ह्यातून 160 जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे.यासाठी सांगली आगार - 15, मिरज - 25, इस्लामपूर - 10, तासगाव - 18, विटा - 20, जत - 10, आटपाडी - 11, कवठेमहांकाळ - 15, शिराळा - 28, पलूस 8 असे एकूण 160 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दि. 18 जुलै ते दि.25 जुलै या कालावधीत या गाड्या आगारातून सुटणार आहेत. तसेच वारीसाठी जाणार्‍यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असते. याचा विचार करून त्यांना आगारापर्यंत जाण्यास लागू नये म्हणून विभागातर्फे मागेल त्या गावात एसटी अशी सोय केली आहे. त्यामुळे गावातील वारकर्‍यांनी अगोदर सुचना दिल्यास त्यांना त्या गावात त्यावेळेत गाडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा त्रास वाचणार आहे. 

परतीच्या प्रवासासाठी ऑनलाईन बुकींग

एकादशी  दि. 23 जुलैरोजी आहे. तसेच  दि. 25 जुलैला बेंदूर हा सण आहे. त्यामुळे  दि.24 जुलैपर्यंत वारकरी परतीच्या प्रवासासाठी निघणार आहेत. पंढरपूरहून गावी येण्यामध्ये त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दि. 24 जुलैसाठी ऑनलाईन बुकींगची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकर्‍यांनी याचा लाभ घेऊन गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.