Sun, Feb 24, 2019 08:34होमपेज › Sangli › राष्ट्रवादी नगरसेवकांची महापालिकेत महाआरती

राष्ट्रवादी नगरसेवकांची महापालिकेत महाआरती

Published On: Dec 16 2017 1:47AM | Last Updated: Dec 15 2017 11:43PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात महापालिकेत तिसर्‍या दिवशीही राष्ट्रवादीचे सत्याग्रह आंदोलन सुरूच होते. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गणपती प्रतिमापूजन करून महाआरती केली. ‘आयुक्तांनी सुरू केलेले महापालिकेचे वाटोळे थांबावावे. विकासकामांसाठी त्यांना सद्बुद्धी द्यावी’ अशी प्रार्थना विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, विष्णु माने, युवराज गायकवाड यांनी  यावेळी  केली.  आयुक्त हे भाजपचे प्रवक्ते असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.

मोहिते महणाले, गेल्या दोन वर्षांपासून खेबुडकर यांनी विकासकामांच्या फाईल अडविण्याचाच उद्योग केला आहे. त्यांनी गैरकारभार रोखावा, चुकीच्या फाईलवर सही करू नये.  पण प्रत्येक फाईलवर शेरेबाजी करून त्यांनी विकासकामे रोखण्याचाच उद्योग केला आहे. एकीकडे 188 कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा दावा ते करीत आहेत. मग ती विकासकामे झाली कुठे? नगरसेवकांच्या लाख-दोन लाखांच्या स्थानिक विकासाच्या फाईलवरही सही करायला त्यांना  वेळ नाही. मात्र त्यांच्या इंटरेस्टच्या अमृत , ड्रेनेज  आणि घरकुल योजनेच्या ठेकेदारांच्या फाईल मार्गी लावायला गती आहे.  महासभा, स्थायी समितीचीही त्यांना कदर नाही.त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे उघड आहे.

युवराज गायकवाड म्हणाले,  नागरी सुविधांसाठी आयुक्तांचे उंबरे झिजवूनही त्यांनी दखल घेतली नाही. माझे कोणी काहीही करू शकत नाही अशीच त्यांची भूमिका दिसते. यासाठीच आम्ही लोकशाही मार्गाने सत्याग्रह केला. पण त्याचेही त्यांना देणे-घेणे नाही.  त्यांनी गैरकारभार केला नसेल तर  नेमके काय केले ते  त्यांना जाहीर करायला अडचण कोणती आहे? उलट ते भाजपचे प्रवक्ते असल्याप्रमाणे आमच्यावर स्टंटबाजीचे आरोप करीत आहेत. 

ते म्हणाले, आता आम्ही कामे मंजूर झाल्याशिवाय आंदोलन थांबविणार नाही. प्रसंगी जनतेच्या विकासकामांसाठी आयुक्तांनी आमचे नगरसेवकपद घालविले तरी हरकत नाही.  शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णु माने, प्रा. पद्माकर जगदाळे, अल्लाउद्दीन काझी, नगरसेविका आशा शिंदे, संगीता हारगे, प्रियांका बंडगर, प्रार्थना मदभावीकर, अंजना कुंडले, मागासवर्गीय सभापती स्नेहल सावंत, आनंदा देवमाने, अभिजित हारगे, प्रसाद मदभावीकर आदी उपस्थित होते.