Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Sangli › सकाळी आलेला शिक्षक बदल्यांचा आदेश दुपारी रद्द

सकाळी आलेला शिक्षक बदल्यांचा आदेश दुपारी रद्द

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 10:59PMसांगली : प्रतिनिधी

उन्हाळा सुटीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाचा शुक्रवारी पहिला दिवस होता. शाळा सुरू झाल्या तरी अद्याप बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी 48 शिक्षकांच्या बदल्यांचा आदेश राज्यस्तरावरून आला. मात्र काही त्रुटींमुळे बदल्यांचा हा आदेश दुपारी राज्यस्तरावरून रद्द करण्यात आला.  

राज्यस्तरावरून तीन टप्प्यात जिल्हा परिषदेकडील 2 हजार 444 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. दरम्यान जिल्हांतर्गत बदलीद्वारे विस्थापित झालेल्या 66 शिक्षकांना अद्याप नेमणुकीचे ठिकाण मिळालेले नाही. रिक्त पदांच्या समानीकरणासाठीच्या जागेवर बदली झालेल्या 54 शिक्षकांनाही फेरबदलीचे आदेश अद्याप मिळालेले नाहीत. 48 शाळा शुन्य शिक्षकी राहिल्या आहेत. या शाळांवर शिक्षक नेमणूक व्हायची आहे. सध्या तात्पुरती व्यवस्था म्हणून नजिकच्या शाळेतील शिक्षकांची या शाळांवर व्यवस्था केलेली आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेले 93 शिक्षकही राज्यस्तरावरून येणार्‍या पदस्थापना आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत. 

शुक्रवारी सकाळी राज्यस्तरावरून 48 शिक्षकांच्या बदलीची यादी जिल्हा परिषदेत आली. प्रशासनाने ही यादी ‘डाऊनलोड’ केली. रँडम राऊंडमुळे या 48 शिक्षकांच्या बदल्या आटपाडी आणि जत तालुक्यात झाल्या होत्या. त्यामुळे संबंधित शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत होता. मात्र शाळांची व एकूण प्रशासनाची गरज म्हणून या शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी हजर होणे अनिवार्य होते. मात्र काही त्रुटी राहिल्याने बदल्यांची ही यादी ‘ग्रामविकास’ने दुपारी मागे घेतली. आता जिल्हांतर्गत बदलीद्वारे पदस्थापना देणे बाकी असलेले तसेच आंतरजिल्हा बदलीने आलेले अशा सर्वच शिक्षकांची एकत्रित बदली/पदस्थापना यादी राज्यस्तरावरून शनिवारी येणे अपेक्षित आहे.