समडोळी : वार्ताहर
तुटलेल्या उसाच्या कांड्या क्रेनने ट्रॉलीत भरत असताना के्रनच्या शेजारील उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांना धक्का बसला. परिणामी, वीजप्रवाह ट्रॉलीत शिरून ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला. बाळासाहेब भूपाल कौजलगे (वय 39, रा. कुडची, कर्नाटक) असे त्या चालकाचे नाव आहे.
माळवाडी-कुंभोजदरम्यानच्या पुलाजवळ असणार्या शेतात सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. यावेळी प्रसंगावधान राखल्याने क्रेनचालक थोडक्यात बचावला.
माळवाडी (ता. मिरज) येथील शेतकरी श्रेणिक निरवाणे यांच्या शेतात ऊसतोड सुरू आहे. सोमवारी दुपारी क्रेनच्या मदतीने तुटलेल्या उसाच्या कांड्या टॅ्रक्टर ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम सुरू होते. शेजारी उच्च दाब वीज वाहिनी असल्याने टॅ्रक्टरचालक चालकाला क्रेन व्यवस्थित चालवण्याबाबत सूचना देत होता. दरम्यान, शेतात असणार्या उच्चदाबाच्या विद्युततारांना क्रेनचा स्पर्श झाल्याने ट्रॉली व ट्रॅक्टरमध्येही उच्च दाबाचा वीज प्रवाह शिरला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने टॅ्रक्टर चालक बाळासाहेब कौजलगे यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टरचे टायर जळून खाक झाले. अन्य पार्टचेही मोठे नुकसान झाले. हा ट्रॅक्टर रूकडी - माणगाव येथील सचिन रावसाहेब पाटील व धनगोंडा बाळगोंडा पाटील यांच्या मालकीचा आहे.