Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Sangli › जिल्ह्यात 203 बालके तीव्र कुपोषित

जिल्ह्यात 203 बालके तीव्र कुपोषित

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 29 2018 11:57PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात 203 बालके तीव्र कुपोषित आहेत. या बालकांवर ग्राम बाल विकास केंद्रांच्या माध्यमातून 60 दिवसात नॉर्मल श्रेणीत आणण्याचे आव्हान पेलण्याचा निर्धार शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभेत करण्यात आला. जिल्हा परिषदेत शुक्रवारी महिला व बालकल्याण समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी होत्या. सदस्या संध्या पाटील, सीमा मांगलेकर, संगीता नलवडे, वंदना गायकवाड, कलावती गौरगोंड, माया एडके, रेखा बागेळी, शोभा कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राजमाता जिजाऊ पोषक अभियान जागृती मोहिम राबविली जात आहे. लोकसहभाग तसेच शासन अनुदानातुन कुपोषित बालकांना जादा आहार दिला जात आहे. 

आरोग्याच्या सेवा-सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या मोहिमेचा परिणाम म्हणून 200 हून अधिक कुपोषित बालकांचे श्रेणीवर्धन झालेले आहे. दरम्यान तीव्र कुपोषित 203 बालकांनाही सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी 60 दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन राबविण्यात येत आहे. ग्राम बाल विकास केंद्रांच्या माध्यमातून तीव्र कुपोषित बालकांवर आहार व औषधोपचाराद्वारे त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणले जाणार आहे. एकही बालक  कुपोषित राहू नये यासाठी  प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती  प्रा. डॉ. नायकवडी यांनी दिली. अंगणवाड्यांतील बालकांचे वजन घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने वजन काट्यांसाठी 47 लाख रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती प्रा. डॉ. नायकवडी यांनी दिली. 

खासगी ‘केजी’तील 500 बालके अंगणवाडीत

जिल्ह्यातील अंगणवाड्यांची गुणवत्ता वाढविण्यात येत आहे. सेवा-सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. आयएसओ मानांकित अंगणवाड्यांची संख्या वाढत आहे. या सार्‍यांचा परिणाम म्हणून खासगी ‘केजी’मधील 500 हून अधिक बालकांनी अंगणवाडीत प्रवेश घेतला आहे, अशी माहिती देण्यात आली.