होमपेज › Sangli › ऊस उत्पादक तोडीसाठी मेटाकुटीस

ऊस उत्पादक तोडीसाठी मेटाकुटीस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कडेगाव  :  संदीप पाटील 

चालू वर्षी जिल्ह्यासह कडेगाव तालुक्यातील कारखान्यांकडे ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी आहे. त्यामुळे चालू गळीत हंगाम एप्रिल अखेर लांबण्याची चिन्हे आहेत. तर तोडणी मजुरांकडून अडवणूक होत असल्याने ऊसऊत्पादक शेतकरी कमालीचा संतप्त झाला आहे. दरवर्षी कारखान्यांकडून मार्चमध्ये कारखाने केव्हा बंद होणार, याची घोषणा केली जाते. परंतु  यावेळी मार्च संपला तरी कोणत्याच कारखान्याने कारखाना कधी बंद होणार याची तारीख जाहीर न केल्याने हंगाम एप्रिल अखेर चालण्याची शक्यता  वर्तविली जात आहे.

सध्या कडेगाव तालुक्यात सरासरीपेक्षा तीस टक्केहून अधिक ऊस शिल्लक आहे. तोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे कारखाना कर्मचार्‍यांना ऊस कार्यक्रम राबविणे कठीण बनले आहे.  दुसरीकडे ऊस वाळू लागल्याने गाळपासाठी पाठविण्यासाठी शेतकरी स्लिपबॉय व तोडणी मुकादम यांची केविलवाणी विनंती करीत असल्याचे चित्र तालुक्यातील  गावात दिसत आहे. ऊस तोडणी मुकादमांकडून शेतकर्‍यांची अडवणूक करून तोडणीसाठी एकरी आठ ते दहा हजार रुपयांची मागणी होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या पाण्याअभावी व हुमणी किडीने उसाची चाळण झाली आहे. दरापासून ते ऊस गाळपासाठी नेण्यापर्यंत शेतकरी चांगलाच भरडला जात आहे. 

काही महिन्यापूर्वी शेतकर्‍यांनी हुमणी किडीने बाधित झालेल्या उसाची चार्‍यासाठी 500 ते 700 रुपये गुंठ्याने विक्री केली आहे. सध्या पाण्याअभावी व उन्हाच्या प्रचंड तीव्रतेने ऊस वाळून त्याची चिपाडे झाली आहेत. परंतु या गोष्टीकडे कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी डोळेझाक करीत असल्याने ऊस तोडणी मजुरांचे चांगलेच फावले आहे. कडेगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून आलेल्या ताकारी व टेंभू योजनेच्या पाण्यामुळे या भागात ऊस क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या भागात कारखान्यांची संख्या वाढल्याने त्यांना कार्यक्षेत्रातच मुबलक प्रमाणात ऊस मिळत आहे. दरवर्षी ऊस तोडणीसाठी कारखान्याच्या कर्मचार्‍यांना उसासाठी शेतकर्‍यांच्या पाठीमागे लागावे लागत होते. परंतु यंदा तोडणी यंत्रणेअभावी शेतकरी कारखान्याच्या शेती अधिकारी व स्लिपबॉयच्या पाठीमागे लागत विणवणी करताना दिसत आहे. यंदा मार्च महिना संपत आला तरी ऊस अजून  शिल्लक आहे.

Tags : Sangli, Sangli News, current year, the number, sugarcane laborers,  less,  Kadegaon taluka 


  •