Fri, Jul 19, 2019 05:44होमपेज › Sangli › ग्राम स्वराज्य अभियान केवळ कागदावर राहू नये

ग्राम स्वराज्य अभियान केवळ कागदावर राहू नये

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 11:55PMसांगली : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने दि. 14 एप्रिल ते 5 मे 2018 या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्याबाबत आदेश काढला आहे. हे अभियान केवळ कागदावर राहू नये. अभियान केवळ औपचारिक राहू नये. ते प्रभावीपणे राबविले जावे, असे आवाहन खासदार  संजय पाटील यांनी जिल्हा परिषदेतील बैठकीत अधिकार्‍यांना केले. जिल्हा परिषदेत सोमवारी खासदार पाटील यांनी बैठक घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत तसेच जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. 

भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने दि. 14 एप्रिल ते दि. 5 मे 2018 या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्याचे निश्‍चित केलेले आहे. सामाजिक सलोखा वृद्धींगत करणे, ग्रामीण भागातील गरिबांपर्यंत पोहोचणे, सद्यस्थितीत कार्यरत योजनांची माहिती घेणे, नवीन उपक्रमांमध्ये समावेश करून घेणे, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे, स्वच्छतेचा कार्यक्रम पुढे नेणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे ग्राम स्वराज अभियानाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.  हे अभियान प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे, असे खासदार पाटील यांनी सांगितले. 

दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) यादीतील कुटुंबांच्या कल्याणसाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. मात्र अनेक गोरगरिब कुटुंबांचा ‘बीपीएल’ यादीत समावेश नाही. त्यामुळे वंचित कुटुंबे शासनाच्या लाभाच्या योजनांपासून वंचित रहात आहेत. वंचितांची नावे बीपीएल यादीत यावीत यासाठी सर्व्हे करून दि. 24 रोजीच्या ग्रामसभेसमोर ती ठेवावीत. त्याअनुषंगाने कार्यवाही व्हावी, असे निर्देश खासदार पाटील यांनी दिले. 

प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील बालकांना ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोग निधीतून दूध वाटप करावे. विद्यार्थ्यांचे कुपोषण कमी होण्याबरोबरच शेतकर्‍यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल, असे खासदार पाटील यांनी सांगितले. 

जिल्ह्यात प्रत्येक खातेदारला जमिनीची आरोग्य पत्रिका उपलब्ध व्हावी. आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर झाल्यास खर्चात बचतीबरोबरच  शेती उत्पन्न वाढीस मदत होईल, असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

Tags : sangli, MP Patil, Monday, meeting,  Zilla Parishad, sangli news,