होमपेज › Sangli › खानापूर तालुक्यात वाळूतस्कर शिरजोर

खानापूर तालुक्यात वाळूतस्कर शिरजोर

Published On: May 21 2018 1:04AM | Last Updated: May 20 2018 10:35PMविटा : प्रवीण धुमाळ

खानापूर तालुक्यात  वाळू माफिया पुन्हा  शिरजोर झाले  आहेत. तस्करीसाठी जेसीबी, डंपर, पिकअप व्हॅनचा वापर होत आहे. डेपो करुन वाळूची खुलेआम वाहतूक होत आहे. महसूल विभागाला टीप देऊनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत  आहे.तालुक्यात येरळा आणि  अग्रणी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. काही राजकीय नेते समर्थकांना सांभाळण्यासाठी  दुर्लक्ष करीत असल्याने तस्करांचे फावले आहे. दुचाकीवरुन फिरणारी व्यक्ती काही महिन्यांतच अलिशान गाडीतून फिरताना दिसते आहे. रातोरात लाखो रुपयांची कमाई होत आहे. या पैशातून गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. 

शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून तस्करी सुरू आहे. येरळा नदीकाठच्या चिखलहोळ, हिंगणगादे, कान्हरवाडी, बलवडी (भा.), तांदळगाव, वाझर, कमळापूर, भाळवणी परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहे. हिंगणगादे येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत आहे. नदीपात्रा शेजारी असलेल्या जमिनीत वाळूचे डेपो केले जात आहेत. पिकअप व्हॅनमधून या वाळूची वाहतूक केली जात आहे. 

भिकवडी येथील  काळ ओढ्यातून  बेसुमार  उपसा करुन वाळूज हद्दीत डेपो केले आहेत. या ठिकाणहून वेजेगाव, वाळूज, लेंगरे परिसरात वाळू पुरविली जात आहे. म्हसवड (ता. माण) येथील वाळू खानापूर घाटमाथा आणि लेंगरे परिसरात पोहोच केली जाते. सध्या येरळा नदीत टेंभू योजनेचे पाणी सोडल्याने भाळवणी  आणि तांदळगाव परिसरातील पात्रातून वाळू उचलून त्याची वाहतूक केली जात आहे. सध्या एका ब्रासला 8 ते 10 हजार रुपये  दर घेतला जात आहे. वाळू तस्करीतून भरपूर पैसे मिळत असल्याने गुन्हेगारी वाढली आहे. या तस्करीत  कॉलेजच्या तरुणांनाही मदतीसाठी  घेतले  जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हिंगणगादे आणि चिखलहोळ ग्रामपंचायतीने वाळू तस्करी बंद करावी, यासाठी प्रशासनाकडे ठराव देऊनही बेकायदा वाळू तस्करी सुरूच आहे. 

आंदोलनाची तयारी

सध्या तालुक्यातील काही भागात टेंभू, आरफळ योजनांचे पाणी  आले आहे. त्यामुळे आर्थिक सुबत्ता आली आहे. मोठ्या प्रमाणावर घरांची बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे वाळूला मागणी मोठी आहे. त्यामुळे तस्करांचे फावले आहे.  तालुक्यातील ठराविक वाळू तस्करच मालामाल होत  असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रशासनाने या वाळू उपशाकडे  गांभीर्याने  लक्ष दिले नाही तर  नदीकाठची गावे आंदोलनाच्या तयारीत आहेत.