Sat, Jul 20, 2019 21:20होमपेज › Sangli › जोधपूर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी प्रवाशांना लुटले

जोधपूर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी प्रवाशांना लुटले

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 1:11AMमिरज : प्रतिनिधी

जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेसमधील आठ प्रवाशांना चोरट्यांनी अडीच लाखांना लुटले आहे. लोणावळा-पुणे दरम्यान मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे. संतप्त प्रवाशांनी सालपा स्थानकाजवळ काही वेळ गाडी रोखून धरली होती. 

प्रवासी गाढ झोपेत असताना हा प्रकार घडला. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचा बंदोबस्त असतानाही गेल्या काही महिन्यात चोर्‍यांचे प्रकार तसेच गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याबद्दल प्रवाशांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.

लुटण्यात आलेल्यांमध्ये एस.6 बोगीतून प्रवास करणार्‍या नलिनी रमेश खंडेलवाड (रा. फलोपूर, जि. सिकर, राजस्थान) यांचे साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र, चेन, कर्णफुले व आयफोन मोबाईल असा दीड लाखांचा ऐवज असलेली पर्स लंपास झाली. 

याच बोगीतील शाम मिलन यादव (रा. अंबानगर, सुरत) यांच्या खिशातील 8 हजार रुपये रोकड असलेले पाकीट, रेखा राजू सेन (रा. सकलेशपूर, जि. हसन) यांचा 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व 5 हजार रुपये रोकड  असलेली पर्स, वत्सल विनोद  परमार (रा. कोल्हापूर) यांचा मोबाईल, रोख रक्कम व 10 हजारांचा ऐवज असलेली बॅग लंपास करण्यात आली.

भाग्यश्री विजय शहा (रा. विद्यानगर, सांगली) या व त्यांच्यासह प्रवास करणारे अन्य तिघे यांच्याकडील रोख रक्कम व 16 हजार 500 रुपये किंमतीचे मोबाईल, एस 9 बोगीतून प्रवास करणारे शीतल महावीर तुपळे (रा. कुसनाळ, ता. अथणी) यांचा 15 हजारांचा मोबाईल व एस 5 बोगीतून प्रवास करणारे किशन वासुदेवभाई कोहली-पटेल (रा. झोलापूर, ता. सानंद, जि. अहमदनगर) यांचा 9 हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला.

गाढ झोपेतील प्रवासी जागे झाल्यानंतर चोरीचा प्रकार प्रवाशांच्या लक्षात आला. त्यानंतर या प्रवाशांनी आरडाओरडा करून सालपा स्थानकाजवळ गाडी थांबविली. यानंतर सुरक्षा रक्षकांनी चोरीचा प्रकार घडलेल्या बोगीमध्ये जाऊन प्रवाशांची समजूत काढून गाडी मिरजेपर्यंत आणली.  या ठिकाणी चोरी संदर्भात रेल्वे पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली. हा चोर्‍यांचा प्रकार पुणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडला. 

सततच्या चोर्‍यांमुळे प्रवाशांत चिंता...

गेल्या काही महिन्यात राजस्थानमधून कर्नाटककडे जाणार्‍या अजमेर, जोधपूर, म्हैसूर, गोवा एक्स्प्रेसमध्ये चोर्‍या आणि गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांचा बंदोबस्त असूनही सतत चोर्‍या वाढत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवास धोकादायक बनला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चोरीची घटना एका ठिकाणी अन् तक्रार दुसर्‍या ठिकाणी यामुळे गुन्ह्यांचा तपास वेळेत होत नाही. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.