Tue, Jul 16, 2019 01:37होमपेज › Sangli › आष्टा ‘भावई’त ‘थळपूजा’, ‘जोगण्या’ खेळ उत्साहात

आष्टा ‘भावई’त ‘थळपूजा’, ‘जोगण्या’ खेळ उत्साहात

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 8:11PMआष्टा : प्रतिनिधी

आष्टा येथे श्री चौंडेश्‍वरी  देवीच्या ‘भावई’ उत्सवात ‘थळपूजा’ व ‘जोगण्या’ हा खेळ गुरूवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. 

बुधवारी रात्री यातील सोळा खेळगडी एका खेळगड्याच्या घरी जमले.  पूजा झाली. नंतर  खेळगडी व मानकरी थोरात सरकार व अन्य मानकर्‍यांच्या घरात नैवेद्य मागून घेऊन ‘थळपूजे’ साठी गेले. परंपरेनुसार  पूजा स्वीकारून सर्वजण मिरवुकीने श्री  अंबाबाई मंदिरात आले. ‘जोगण्या’ देवीच्या सैन्याने शोध घेवूनही दैत्य सापडला नाही. त्यामुळे श्री चौंडेश्‍वरी देवी हातात  तलवार घेऊन दैत्याच्या शोधासाठी बाहेर पडते. हे कथानक या खेळांतून दाखविले जाते.  

‘जोगण्या’ होणारे खेळगडी युध्दाचा पेहराव करून रणचंडिकेच्या रूपात व रणवाद्यांच्या गजरात गुरूवारी पहाटे  अंबाबाई मंदिरातून बाहेर पडले.  यामध्ये दोन जोगण्या व एक जोगणी असते. मिरवणुकीवेळी जोगण्यांच्या हातातील चांदीची वाटी कोणी पळवू नये म्हणून सर्वजण दक्ष असतात.  विशिष्ट तालासुरात वाजणार्‍या रणवाद्यांच्या गजरात छत्र्या, चामर, चौंडके, रणशिंग, कैताळ, पावा यांच्यासह हा लवाजमा कापडपेठेत आल्यानंतर त्यांना चौथी जोगणी मिळते. या चार ‘जोगण्या’  मारूती मंदिराच्या पाठीमागील ओढ्याशेजारी  आल्यानंतर त्यांची पहिली पूजा झाली.  मिरजवेशीत जोगण्यांची पूजा करण्यात आली. खेळगडी व मानकर्‍यांना पानाचे विडे व घुगर्‍यांचा प्रसाद वाटण्यात आला. सर्व मानकर्‍यांच्या घरातील पूजा झाली. जोगा व जोगणीच्या लग्नानंतर ‘जोगण्या’अंबाबाई देवळात परत आल्या. सायंकाळी ‘लोट’ हा खेळ झाला.