होमपेज › Sangli › शिराळा पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून आंदोलन

शिराळा पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून आंदोलन

Published On: Jun 19 2018 1:24AM | Last Updated: Jun 18 2018 11:08PMशिराळा : प्रतिनिधी

शिराळा पोलिस ठाण्याकडून अपघाताबाबत अक्षम्य दुर्लक्ष व हलगर्जीपणा केल्याबद्दल इंग्रुळ (ता. शिराळा) येथील ग्रामस्थांनी अपघातातील मृत विजय जिनगोंडा पाटील (वय 36) यांचा मृतदेह शिराळा पोलिस ठाण्याच्या आवारात सुमारे चार तास ठेवून आंदोलन केले.

सहाय्यक पोलिस फौजदार  बी. के. पाटील यांनी अपघाताची नोंद लवकर घेतली नाही, उद्धट वर्तन केले व अपघातातील चालकाचे नाव बदलले, आदी आरोपाबाबत बी. के. पाटील यांच्यावर कारवाई करावी व अपघातातील खर्‍या चालकाला अटक करावी, या मागणीसाठी चार तास मृतदेह ठेवून आंदोलन करण्यात आले. याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवार, दि. 16 जूनरोजी सायंकाळी नाथ फाटा बाह्य वळण रस्त्याजवळ बलोरो गाडी (एम एच 10 - सी. जे. 6699)  घेऊन संतोष उर्फ विजय बल्लाळ मांगलेहून शिराळ्याकडे येत होता.

त्याची धडक दुचाकी (एम.एच. 10 /एसी. 2549) याला बसली. ही दुचाकी सूर्यकांत रामचंद्र रोकडे (रा. इंग्रुळ ) हा चालवत होता. मागे विजय जिनगोंडा पाटील हे बसले होते. ते शिराळाहून इंग्रुळला चालले होते. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. सूर्यकांत रोकडेला इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांचा पाय मोडला तर विजय जिनगोंडा पाटील गंभीर असल्याने कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईक व ग्रामस्थ यांनी सोमवारी दुपारी मृतदेह शिराळा पोलिस ठाण्यात आणला व ते पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले व आंदोलन सुरू केले. त्यावेळी तपास अधिकारी बी. के. पाटील यांच्यावर कारवाई करा, खर्‍या आरोपींना अटक करा, या मागणीसाठी मृतदेह ठाण्यात ठेवून आंदोलन सुरू केले.

चार तास सलग चर्चा करून मार्ग निघाला नाही. शेवटी बी. के. पाटील यांच्यावरील आरोपांचा अहवाल वरिष्ठांना सादर करू, तपास अधिकारी बदलू, तपास योग्य करू आदी आश्‍वासन लेखी स्वरूपात आंदोलकांना देण्यात आले. यानंतर संबंधितांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी इंगरूळ येथे नेला.

शिराळ्याच्या इतिहासात मृतदेह पोलिस ठाण्यात ठेवून आंदोलनाची पहिलीच घटना घडली असून याची बातमी गावात पसरताच मोठी गर्दी झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य पाहून आष्ट्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, कुरळपचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील, शिराळ्याचे पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे, पोलिस फौजदार डी. एन. वाईकर यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मयत विजय पाटील यांच्या पश्‍चात  आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.