Tue, Mar 26, 2019 19:54होमपेज › Sangli › जिल्हा बँकेत वसुली, नोकरभरतीवरून जोरदार चर्चा

जिल्हा बँकेत वसुली, नोकरभरतीवरून जोरदार चर्चा

Published On: Mar 24 2018 1:54AM | Last Updated: Mar 23 2018 10:57PMसांगली : प्रतिनिधी

थकबाकी वसुली व नोकरभरती यावरून जिल्हा बँक संचालक मंडळ सभेत जोरदार चर्चा झाली. मार्चअखेर  वसुली न झाल्यास एप्रिलमध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय झाला. भरतीबाबतच्या उलट-सुलट चर्चांनी बदनामी होत असून भरती पारदर्शीच करा, पण तातडीने करा, अशी भावना संचालकांनी व्यक्‍त केली. जिल्हा बँकेत शुक्रवारी संचालक मंडळाची सभा झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, बी. के. पाटील, प्रा. सिकंदर जमादार,  सुरेश पाटील, विक्रम सावंत, डॉ. प्रताप पाटील, उदयसिंग देशमुख, गणपती सगरे, चंद्रकांत हाके, बाळासाहेब होनमोेरे, कमल पाटील, श्रद्धा चरापले, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक बी. एम. रामदूर्ग, मानसिंगराव पाटील उपस्थित होते. ‘टॉप-20’ संस्थांकडील थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान बँकेसमोर आहे. काही संस्था बड्या राजकीय व्यक्‍तींशी संबंधित आहेत. वसुलीसाठी या संस्थांना यापूर्वीच नोटिसा दिलेल्या आहेत. मार्चपर्यंत घाईने कारवाई न करता सबुरीने वसुली करावी. मार्चअखेर वसुली न झाल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करावी, असा निर्णय झाला. वसुली व ठेववाढीसाठी पाठपुरावा करण्याचाही निर्णय झाला. 

नोकरभरती बाबतच्या उलट-सुलट चर्चांमुळे होत असलेली अस्वस्थता सभेत उमटली. नोकरभरती पारदर्शीच करा, पण तातडीने करा. कर्मचार्‍यांची रिक्‍त पदे चारशेहून अधिक आहेत. कामाचा ताण वाढत आहे. दोन कर्मचार्‍यांचा हृदयविकाराने मृत्यूही झाला आहे. भरतीप्रक्रिया पारदर्शी करा. भरतीसाठी कोणतीही एजन्सी नेमा, पण भरती तातडीने करा, अशा भावना व्यक्‍त झाल्या. दरम्यान, एप्रिलमध्ये भरतीप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झाला. एका साखर कारखान्याकडील माल ताबेगहाण असलेल्या साखरेवरील 2.72 कोटींचा एक्साईज टॅक्सचा विषय चर्चेला आला. मार्चअखेर संबंधित साखर कारखान्याच्या नावे 2.72 कोटी रुपये ‘डेबिट’ टाकण्याचा निर्णय झाला. 

Tags : Sangli, Sangli News, case of money recovery, in April, take legal action