Fri, Jul 19, 2019 05:49होमपेज › Sangli › कोकणातील 114 पैकी 16 ‘भूमिपुत्र’ शिक्षक सांगलीत

कोकणातील 114 पैकी 16 ‘भूमिपुत्र’ शिक्षक सांगलीत

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 10:16PMसांगली : प्रतिनिधी 

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेकडे कार्यरत असणार्‍या व आंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात म्हणजे सांगली जिल्ह्यात येऊ इच्छिणार्‍या 114  शिक्षकांना कार्यमुक्त केले नव्हते. मात्र तब्बल वर्षानंतर 114 पैकी 16 शिक्षकांना रत्नागिरी जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केले आहे. कोकणातून कार्यमुक्तीस सुरूवात झाल्याने सांगली जिल्ह्यातून बाहेर जाणार्‍या शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

सांगली जिल्ह्यातील बरेच शिक्षक रत्नागिरी, सिंधुदूर्ग व अन्य जिल्हा परिषदेकडे कार्यरत आहेत. आंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात (सांगली) येऊ इच्छिणार्‍या शिक्षकांची संख्या बरीच आहे. दरम्यान सन 2017 च्या आंतरजिल्हा बदलीद्वारे रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात 114 शिक्षक येणार होते. मात्र संबंधित जिल्हा परिषदांनी शिक्षकांच्या रिक्त जागांकडे लक्ष वेधत या शिक्षकांना कार्यमुक्त केले नव्हते.दरम्यान सांगली जिल्हा परिषदेनेही यावर्षी सांगली जिल्हा परिषद शाळांकडील रिक्त पदांकडे लक्ष वेधत आंतरजिल्हा बदलीद्वारे जिल्ह्याबाहेर जाणार्‍या 208 शिक्षकांना रोखून धरले आहे. या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. कोकणात असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त करावे व शिक्षकांच्या रिक्त पदांचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी राहत असेल तरच जिल्ह्याबाहेर जाणार्‍या शिक्षकांना कार्यमुक्त केले जाईल, असा पवित्रा सांगली जिल्हा परिषदेने घेतला आहे. 

दरम्यान सन 2017 मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या पण कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना रत्नागिरी जिल्हा परिषदेने कार्यमुक्त करण्यास सुरूवात केली आहे. रत्नागिरीहून 60 पैकी 16 शिक्षक जिल्हा परिषदेकडे हजर झाले आहेत. रत्नागिरीतील उर्वरीत शिक्षकांनाही कार्यमुक्त केले जाईल व ते लवकरच सांगली जिल्हा परिषदेकडे हजर होतील, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास सांगली जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाणार्‍या 208 शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरतीही आवश्यक आहे. 

जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांची यादी रखडली

जिल्हा परिषदांकडील शिक्षक बदल्यांची कार्यवाही सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात धुळे, बुलढाणा जिल्हा परिषदेकडील शिक्षक बदल्यांची यादी संबंधित जिल्हा परिषदेच्या सीईओ लॉगिनवर आली. दुसर्‍या टप्प्यात सोलापूर, कोल्हापूर, सातारा व अन्य काही जिल्ह्यातील बदल्यांची यादी सीईओ लॉगिनवर आली. सांगली जिल्हा परिषदेकडील जिल्हांतर्गत बदल्यांची यादी मात्र रखडली आहे. या यादीकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

60 पैकी 38 शिक्षक अन्य जिल्ह्यातून आले

सन 2018 च्या आंतरजिल्हा शिक्षक बदलीद्वारे सांगलीतून अन्य जिल्हयात 208 शिक्षक जाणार आहेत, तर अन्य जिल्ह्यातून सांगलीत 60 शिक्षक येणार आहेत. या 60 पैकी 38 शिक्षक सातारा, नंदूरबार, सोलापूर आदी जिल्ह्यातून  सांगली जिल्हा परिषदेकडे  हजर झाले आहेत.