Wed, Jul 17, 2019 18:55होमपेज › Sangli › आता शिक्षणापासून कामाला सुरुवात करा

आता शिक्षणापासून कामाला सुरुवात करा

Published On: Aug 19 2018 1:33AM | Last Updated: Aug 18 2018 9:09PMसांगली : शशिकांत शिंदे 

महापालिकेच्या प्राथमिक शाळा सुधारण्याचे आश्‍वासन भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. त्यानुसार आता नवीन कारभार्‍यांवर त्याची अंमलबजावणी  करण्याची जबाबदारी आली आहे. महापालिकेत सुधारणा करण्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. 

गेल्या 20 वर्षांत महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती.  आलटून पालटून नागरिकांनी त्यांना संधी दिली. मात्र त्यांनी अपेक्षित कारभार केला नाही. या कारभार्‍यांनी मोफत दिल्या जाणार्‍या प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. अनेक आजी-माजी नगरसेवकांनी खासगी शाळा काढल्या. त्यामुळे शिक्षणाची सध्याची ही बिकट स्थिती झाली आहे. 

यावेळी नागरिकांसमोर भाजपच्या रुपाने सक्षम पर्याय पुढे आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात असणारे कारभारी सत्तेसाठी एकत्र आले. गणिती भाषेत एक अधिक एक दोन होत असले तरी राजकारणात ते होतेच असे नाही. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या  कारभाराला जनतेने नाकारल्याने भाजप विजयी मिळवत सत्तेत आली. 

भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात विविध आश्‍वासने दिली आहेत. त्यात  महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणात सुधारणा करणे हे एक आश्‍वासन  आहे. शिक्षण ही मुलभूत आणि आवश्यक बाब आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया चांगला असेल तरच भविष्य उज्ज्वल असणार आहे. त्यामुळे भाजपने दिलेल्या आश्‍वासनाची अंमलबजावणी  करण्याची जबाबदारी आता नूतन कारभार्‍यांवर आली आहे. ती ते पार पाडतील अशी अपेक्षा आहे, अन्यथा जनता या कारभार्‍यांना पुढील निवडणुकीत जाब विचारेल. मात्र त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. पण तोपर्यंत या कालावधीत अनेकजण चांगल्या शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे. तो टाळायला हवा.

नगरपालिका असताना सांगली, मिरजेतील  शाळांची स्थिती चांगली होती. त्यावेळी शिक्षण मंडळातील  कारभार्‍यांकडून निस्वार्थ हेतूने चांगला कारभार चालवला जात होता. हुशार विद्यार्थ्यांना शालाबाह्य परीक्षेसाठी प्रोत्साहन देऊन स्वतंत्र तुकड्या करून मार्गदर्शन केले जात होते. खासगी शाळांपेक्षा या शाळांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीत चमकत होते. खेळासाठी प्रोत्साहन दिल्याने क्रीडा क्षेत्रातही अनेक विद्यार्थी पुढे आले. त्या पध्दतीने आताही उपक्रम राबवणे गरजेचे आहे. चांगले काम करणार्‍या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी गौरव करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप  टाकायला हवी. कुचराई करणार्‍या शिक्षकांवर कारवाई करायला हवी. दर महिन्याला शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन व्हायला हवे.