Fri, Mar 22, 2019 07:42



होमपेज › Sangli › सांगलीत उत्स्फूर्त सद्भावना रॅली

सांगलीत उत्स्फूर्त सद्भावना रॅली

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:24AM

बुकमार्क करा




सांगली : प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनातर्फे मकर संक्रांतीचे औचित्य साधून सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या सद्भावना एकता रॅलीला समाजातील विविध घटकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या रॅलीत विविध जाती-धर्मातील समाज बांधव, लोकप्रतिनिधी, पक्ष-संघटना, संस्था यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सर्वांनी एकमेकांचे हात हातात गुंफून भारत मातेचा एकच जयघोष केला. देशभक्‍तीपर घोषणा आणि गीतांमुळे सद्भावना आणि एकतेचा हुंकार उमटला.

कर्मवीर भाऊराव पाटील चौकात रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून रॅलीस सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गांवर फिरत अकराच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर  रॅली आली. यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजय पाटील, खा. अमर साबळे, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाठे, आ. अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुमन पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर हारुण शिकलगार, आयुक्‍त रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आदी सहभागी झाले होते.   कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय एकात्मतेची सर्वांनी शपथ घेतली. यावेळी सर्वांनी स्तब्ध उभे राहून शहिदांप्रति आदरांजली व्यक्‍त केली. भारतातील विविधतेत एकता दर्शवणार्‍या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’  या गीताचे कलाकारांनी उठावदार सादरीकरण केले. त्यानंतर रंगीबेरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. राष्ट्रीय समाजसुधारकांच्या विविध वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी,  देशभक्‍तीपर गीतांनी निर्माण झालेले देशभक्‍तीचे वातावरण यामुळे स्टेडियमवर एक वेगळाच माहोल तयार झाला होता. बहुतेकांच्या चेहर्‍यावर एकतेची भावना उठून दिसून येत होती.  

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, या रॅलीमुळे सांगलीकरांच्या नव्या वर्षाची सुरुवात रचनात्मक, सकारात्मक झाली आहे. आपणाला आपापसामध्ये नव्हे तर देशासाठी लढायचे आहे. तिरंगा हाच आपला धर्म आहे. त्यामुळे देशाची एकता आणि अखंडता कायम राहील. आजच्या या रॅलीच्या माध्यमातून एकसंघतेचा हुंकार, एकतेचा बुलंद आवाज प्रतिध्वनीत झाला आहे. यासाठी सांगलीकरांना मानाचा मुजरा आहे. आमच्यात कोणी फूट पाडू शकत नाही. तसा प्रयत्न केल्यास त्यांचे नामोनिशाण राहणार नाही. आजच्या या रॅलीत तरुण-तरुणींचा सहभाग उत्साहवर्धक आहे.

जिल्हाधिकारी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावनेसाठी आपण सर्व जण एकत्र आलो आहेत. ही सामाजिक एकतेची ज्योत सतत प्रज्वलित राहावी. आजची ही सद्भावना रॅली इतिहास घडवेल. ‘जिंदगी है छोटी, उम्मीदे बडी है, देखो नजर के सामने, ये सद्भावना यात्रा खडी है,’ या त्यांचा शेरला जोरदार दाद मिळाली.