Sat, Feb 16, 2019 05:08होमपेज › Sangli › आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 10:06PMसांगली : प्रतिनिधी

महानगरपालिकेची निवडणूक निर्भय आणि पारदर्शी वातावरणात होण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अत्यंत दक्ष राहावे, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिले.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज विविध विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यात ते बोलत होते.  या बैठकीस जिल्हाधिकारी विजयुकमार काळम- पाटील, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, निवडणूक निरीक्षक नंदकुमार काटकर, प्रवीणकुमार देवरे, राज्य निवडणूक आयोगाचे   सचिव नि. ज. वागळे, उपायुक्त राजाराम झेंडे, महानगरपालिका आय़्ुक्त रवींद्र खेबुडकर आदि उपस्थित होते.

सहारिया म्हणाले,  निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखवण्यात येणार नाही,  त्यांच्यावर दबाव आणला जाणार नाही, याची काळजी घ्या.   गतवेळच्या निवडणुकीत 63 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का अधिक वाढावा, यासाठी विविध मार्गांनी यंत्रणांनी प्रयत्न करावेत .यावेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलिस विभाग यासह सर्व यंत्रणा एकजुटीने काम करीत आहेत. मतदानासाठी रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.   पाोलिस अधीक्षक   शर्मा यांनी तडीपार, जप्त केलेली रोकड आदि कारवाईबद्दल माहिती दिली.