Sat, Mar 23, 2019 16:08होमपेज › Sangli › अनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप

अनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 11:27PMसांगली : वार्ताहर

अनैतिक कारणातून अक्रम मुख्तार शेख (वय 26, रा. मंगळवार पेठ, मिरज) याचा खून केल्याबद्दल अमीर गौस पठाण (वय 27) व मोझम हुसेन शेख (वय 25, दोघे रा. मंगळवार पेठ, मिरज) यांना जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश वर्धन प्रतापराव देसाई यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्‍त जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. 

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी : अमीर पठाण याची नातेवाईक असलेल्या एका महिलेशी अक्रमचे अनैतिक संबंध होते. अक्रम त्या महिलेला घेऊन शहरात राजरोसपणे फिरत होता. या महिलेच्या नातेवाईकांना तो खुन्‍नस देत होता.  तो त्या महिलेशी लग्‍न करणार असल्याचे सांगत होता. याच कारणावरून अमीर, अमीरचे नातेवाईक व अक्रम यांच्यात वाद झाला होता.  दि. 22 फेबु्रवारी 2015 रोजी अक्रम शेख हा एका क्‍लबमध्ये कॅरम खेळत बसला होता. त्यावेळी अमीर पठाण, मोझम शेख हे त्यांच्या चार-पाच साथीदारांसह क्‍लबमध्ये गेले. त्यावेळी त्यांच्याकडे पिस्तूल, कुकरी आदी घातक शस्त्रे होती. 

अमीर पठाण याने प्रथम अक्रम शेख याच्या छातीवर पिस्तूल लावून गोळी झाडली, त्यामुळे तो  जमिनीवर पडला. त्यानंतर मोझम शेख याने  कुकरीने अक्रम याच्यावर सपासप वार केले. अक्रमने त्यापैकी काही वार हाताने अडविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याचा हात मनगटापासून तुटून पडला. त्याचवेळी यातील फिर्यादी मोहसीन हा घाबरुन बॉम्बे बेकरीच्या दिशेने पळत सुटला. 

या हल्ल्यामध्ये अक्रम शेख याच्यावर 34 वार झाले. दोन गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्या. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच दरम्यान अक्रमचा मेव्हणा फिरोज मुजावर हा त्याला घरी जेवणासाठी बोलविण्यासाठी म्हणून घटनास्थळी आला होता. त्यावेळी अमीरच्या हातात पिस्तूल व मोझमच्या हातात कुकरी दिसली. या दोघांसह अन्य संशयित अक्रमवर हल्ला करुन पळून जात असताना फिरोजने पाहिले होते. 

या प्रकरणी क्‍लबचा मॅनेजर मोहसीन बेग याने पोलिसात फिर्याद दिली. मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी आवटे यांनी तपास करुन सहा जणांविरुध्द आरोपपत्र दाखल केले. सरकारपक्षातर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीसह अन्य साक्षीदार खटल्याच्या सुनावणीदरम्यान फितूर झाले. अक्रमचा मेव्हणा फिरोज मुजावर, डॉ. राजेश बरगाले व तपास अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला हवालदार रविंद्र माळकर यांनी मदत केली.