Thu, Apr 25, 2019 21:59होमपेज › Sangli › खरीप हंगामासाठी तातडीने पीककर्ज द्या

खरीप हंगामासाठी तातडीने पीककर्ज द्या

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:06PMसांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकर्‍यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. परिणामी या कालावधीत शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते यासह अन्य आवश्यक सुविधा द्या, बँकांनीही पात्र शेतकर्‍यांना पेरणीसाठी  विनाविलंब पीककर्ज द्यावे, अशा सुचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूलचे उपायुक्‍त प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील,  अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करेे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक विलास काटे आदीसह सर्व उपजिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  डॉ. म्हैसेकर म्हणाले, सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. त्या तुलनेत आतापर्यंत पेरण्यांचे प्रमाण कमी आहे. त्याच्या कारणांचा आढावा कृषी विभागाने घ्यावा. बी-बियाणे, खते यांचा पुरेशा प्रमाणात साठा करून, मागणीप्रमाणे पुरवठा करावा. शेतकर्‍यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, असे आदेश त्यांनी दिले.

ते म्हणाले, शेतकरी बांधवांना पेरणीसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकर्‍यांना समाधानकारक पीक कर्ज वाटप केले आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे अद्याप केवळ 25 टक्केच उद्दिष्ट गाठले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचे प्रमाण वाढविण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना सूचित करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.जलयुक्‍त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे तसेच कृषि विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा आढावा त्यांनी घेतला. जलयुक्‍त शिवार योजना 2018-19 आराखडा उपविभागीय अधिकारी यांनी स्वत: आराखडा तपासून खात्री करावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.