Thu, Jul 18, 2019 05:52होमपेज › Sangli › भारताशी आगळीक केली तर धडा शिकवू

भारताशी आगळीक केली तर धडा शिकवू

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 11:48PMसांगली : प्रतिनिधी

भारताचे सैन्यदल हे जगात सर्वोत्कृष्ट आहे. सर्जिकल स्ट्राईकने सार्‍या जगाने ते पाहिलेले आहे. भारताशी कुणी आगळीक करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर येथे ‘डिफेन्स क्‍लस्टर’ प्रस्तावित केले आहे, अशी माहितीही डॉ. भामरे यांनी दिली. 

वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजच्या पदवीदान समारंभानिमित्त डॉ. भामरे बुधवारी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारताचे सैन्य हे अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत सीमेवर सेवा बजावत आहेत. प्राणाची बाजी लावून देशाचे संरक्षण करत आहेत. देशासाठी ते शहीद व्हायलाही तयार होतात. या सैनिकांबद्दल सर्व देशवासीयांना मोठा अभिमान आहे. देशाचे सैन्य आणि शस्त्रसाठा सुसज्ज असण्याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. या सर्व बाबींमुळे देशाचे सैन्यदल हे जगात सर्वोत्कृष्ट आहे. सर्जिकल स्ट्राईक सर्व जगाने पाहिलेला आहे. तेव्हा भारताशी आगळीक करण्याची हिंमत कोणी करू शकत नाही. भारताशी आगळीक करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर धडा शिकवू. 

डॉ. भामरे म्हणाले, भारताच्या सैन्यदलात तेरा लाख जवान आहेत. आता जवानांच्या रिक्‍त जागांचा मुद्दाच राहिलेला नाही. युद्धाची पारंपरिक पद्धत राहिलेली नाही. चीननेही सैनिक कपात केली आहे. सैनिक संख्येपेक्षाही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून सैन्यदल अधिक सुसज्ज करण्यावर भर दिला जात आहे. देशाच्या सैन्यदलाच्या पगारावर 1 लाख कोटींपेक्षा जास्त खर्च आहे. त्यामुळे नवीन शस्त्रास्त्र खरेदीवर मर्यादा येतात. तरीही सैन्य दलाला आवश्यक साधन सुविधा, शस्त्रास्त्रे यामध्ये कुठेही कमतरता भासू दिली जात नाही. बलुचिस्थान, गिलगिटमधील लोकांना स्वातंत्र्य हवे आहे. ते स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही भारताच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना बलुचिस्थान, गिलगिटच्या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे, असेही डॉ. भामरे यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. 

संरक्षण साहित्य आयातदार हा शिक्का पुसायचा आहे : डॉ. भामरे

डॉ. भामरे म्हणाले, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि डिफेन्स प्रोडक्शनच्या विविध 54 आस्थापना आणि 41 ऑर्डीनन्स फॅक्टरीज आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी साधनसामुग्री, शस्त्रास्त्रांसाठी दुसर्‍या राष्ट्रांवर अवलंबून न राहता देशातच निर्मितीसाठीची धोरणे राबविली जात आहेत. स्वदेशी बनावटीच्या निर्मितीवर भर देण्यासाठीच ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून काम सुरू आहे. भारतीय उद्योजक, कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्र या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णता प्राप्त केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली संरक्षणविषयक उत्पादने गुणवत्तेने नाव कमावतील आणि किंमतीतही किफायतशीर ठरतील. संरक्षण साहित्याचे आयातदार हा शिक्का पुसून निर्यातदार होण्यासाठी प्रयत्नपूर्वक काम सुरू आहे. संरक्षण साहित्याचे डिझाईन,  डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्‍चरिंग हे भारतात होईल. त्यासंदर्भात ‘स्टॅटेजिक पॉर्टनर’ या संकल्पनेतून डिफेन्स क्‍लस्टर विकसित केले जाणार आहे. महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर येथे ‘डिफेन्स क्‍लस्टर’ प्रस्तावित केले आहे.