Mon, Aug 19, 2019 17:32होमपेज › Sangli › जमत नसेल तर राजकारण सोडा

जमत नसेल तर राजकारण सोडा

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:12AMसांगली : प्रतिनिधी

पूर्ण झोकून देऊन काम करायला जमत असेल तरच राजकारणात या, हे सरळ गणित आहे. जर जमत नसेल तर राजकारण सोडा आणि घरात बसा, असा सज्जड दम आमदार जयंत पाटील यांनी युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शनिवारी दिला. 

पक्षाच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने त्यांनी आढावा बैठक घेतली. गावागावांत बूथ कमिट्या स्थापन करण्याचे आदेश देऊनही युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. मतभेद आणि विरोधाची कारणमीमांसा कार्यकर्त्यांनी करताच आमदार पाटील यांनी सर्वांचा समाचार घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, अरुणअण्णा लाड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, संचालक बी. के. पाटील, मनोज शिंदे, ताजुद्दीन तांबोळी, युवकचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

गावागावांत कार्यकर्त्यांच्या बूथ कमिट्या तयार करण्याचे आदेश युवक राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांना दिले होते. मात्र युवकच्या पदाधिकार्‍यांनी तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यातील काम झाले नसल्याचे स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील युवकच्या अध्यक्षाने बुथ कमिट्या निवडीत वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे सांगितले. त्यामुळे बूथ कमिट्या नेमण्यात अडचणी येत असल्याची तक्रार थेट जयंत पाटील यांच्याकडे केली. 

याबाबत  पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, राजकारणात अडचणी येत असतात. पक्षातही काही मंडळी जाणीवपूर्वक अडचणी आणतात. पण ‘जमत असेल तर राजकारणात या’ हे आपले सरळ गणित असल्याचे सांगत त्यांनी चांगलेच सुनावलेे. ज्यांना राजकारणात टिकायचे आहे, त्यांनी धडपड केली पाहिजे. ते म्हणाले, युवक राष्ट्रवादीचे इव्हेंट मॅनेजमेट नव्हे, तर नियोजन हवे. गावात फलक लावून फोटो फेसबुकवर लोड करणारे पदाधिकारी नको आहेत. मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. बूथ कमिट्या सक्रिय करणारे आणि मतदार खेचणारे कार्यकर्ते हवे आहेत.  त्यामुळे कागदोपत्री नियुक्ती करून जागा अडवू नका. जमत नसेल तर पदे सोडा.

जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी युवक राष्ट्रवादी आणि तालुका पदाधिकार्‍यांना आगामी निवडणुकीसाठी बांधणी करण्याबाबतच्या सुचना दिल्या. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील, अविनाश पाटील,  जिल्हा परिषदेतील गटनेते शरद लाड, सुरेश शिंदे, चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, आप्पासाहेब हुळ्ळे, हणमंत देशमुख, अ‍ॅड बाबासाहेब मुळीक, किसन जानकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

Tags : Sangli, Sangli New, If not join, leave politics, sit in house