Sun, Aug 25, 2019 23:28होमपेज › Sangli › ते मुख्यमंत्री असते तर राज्याचे भले झाले असते  

ते मुख्यमंत्री असते तर राज्याचे भले झाले असते  

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:07AMसांगली : प्रतिनिधी

दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांचे मुख्यमंत्री होणे हे काही अंतिम ध्येय नव्हते. मात्र त्यांचा कामाचा आवाका आणि धडाका मोठा होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली असती तर आज राज्याची स्थिती वेगळी आणि यापेक्षा चांगली असती, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केले. 

डॉ. कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आदि क्षेत्रातील विविध मान्यवर वक्त्यांनी डॉ. कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला.  आमदार मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भारती विद्यापीठाचे संचालक  एच. एम. कदम, महेंद्र लाड, विक्रम सावंत आदी मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते, विविध संस्थातील कर्मचारी उपस्थित होते. 

आमदार पाटील म्हणाले, विद्यापीठासारखी मोठी  स्वप्न बाळगणारे  आणि ते सत्यात उतरवणारे  डॉ. कदम हे एकमेव नेते होते.  पलूस, कडेगाव तालुक्यांची निर्मिती त्यांनी माझाकडे पाठपुरावा करून केली.  सामान्य कार्यकर्त्यांविषयी त्यांना जाण  होती. सध्या म्हैसाळ पाणी योजनेचा घोळ चार महिन्यांपासून सुरू आहे, मात्र आघाडी सरकार असताना टेंभू, ताकारी, म्हैसाळसाठी त्यांच्या प्रयत्नांमुळे सहज निधी मिळत होता. 

खासदार संजय पाटील म्हणाले, कायम गर्दीत राहणारा नेता, अशी डॉ. कदम यांची ओळख कायम राहील. त्यांच्या जाण्यामुळे जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. ती भरून निघणे अशक्य आहे. 
खासदार राजू शेट्टी म्हणाले, पतंगराव हे दिलदार, हसतमुख नेते होते. आम्ही विरोधात असतानाही त्यांनी आमची अनेक कामे केली. त्यांनी वैयक्तीक पातळीवर कधी कटुता आणली नाही. 
माजी आमदार दिनकर पाटील म्हणाले, डॉ. कदम यांच्या सहवासात आलेल्या अनेकांचे सोने झाले. माझ्यासारख्या नगरसेवकाला त्यांनी आमदार केले. 

ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या,  पतंगरावांनी लोकनेते वसंतदादा पाटील यांच्या शेतकरी संस्कृतीचा विचार पुढे नेला. भाजप नेत्या सौ. नीता केळकर म्हणाल्या डॉ. कदम हे सांगलीचे आयकॉन होते. मुंबईत, मंत्रालयात त्यांचा वचक होता. विरोधकांची सुद्धा ते कामे करीत.  माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार उमाजी सनमडीकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील,  शिवसेना नेते पृथ्वीराज पवार, बजरंग पाटील, ज्येष्ठ साहित्यक प्रा.वैजनाथ महाजन, प्रा. डॉ. जे. एफ. पाटील,  डॉ. दिलीप पटवर्धन आदींची भाषणे झाली. 

Tags : Sangli, Sangli News,  he was chief minister, the state, have been good