Mon, Mar 25, 2019 13:39होमपेज › Sangli › मी लोकसभा लढणार नाही : डॉ. विश्‍वजित कदम

मी लोकसभा लढणार नाही : डॉ. विश्‍वजित कदम

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 10:49PMसांगली : प्रतिनिधी

पलूस-कडेगाव मतदारसंघातच मी पूर्णपणे लक्ष दिले आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणूकच लढणार आहे. कोणी कितीही चर्चा केली तरीही मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे स्पष्ट मत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार बैठकीत व्यक्‍त केले. लोकसभेसाठी अन्य इच्छुकांना शुभेच्छा आहेत. त्यांच्यासाठी पूर्ण ताकद लावू, असे ते म्हणाले. 

डॉ. कदम म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पंतगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यादृष्टीने मी मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. येथील जनतेला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू नये याची दक्षता मी घेणार आहे. त्यामुळे याच विधानसभा मतदारसंघाचाच पूर्ण विचार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीबाबत विचारता ते म्हणाले,  मी ही निवडणूक अजिबात लढविणार नाही. तशी चर्चा केली जात असले तर त्याला अर्थ नाही. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत कधीच विचार केला नाही. काँग्रेसकडे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार आहेत. पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने आणि समन्वयाने लढविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. 

ते म्हणाले, भाजपसारख्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे हे उद्दीष्ट आहे. त्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे वरिष्ठ तसेच स्थानिक नेते एकवटतील. येथे भाजपचे यश ही आमच्यातीलच उणिवांमुळे आलेली सूज आहे. आम्ही एकदिलाने पूर्ण ताकद लावल्यास भाजपला याठिकाणी यश मिळणार नाही. 

डॉ. कदम म्हणाले, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी आगामी सर्व निवडणुकांसाठी एक कार्यकर्ता म्हणून मी प्रत्येकठिकाणी सक्रीय राहणार आहे. येथे जास्तीत जास्त काँग्रेस उमेदवार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कसे विजयी होतील, यासाठी प्रयत्न केले जातील.  यासाठी माझ्यापरीने काहीच कमी पडू देणार नाही,

डॉ. कदम म्हणाले, नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज,  कुपवाड महापालिका निवडणुकीतील पराभवाने बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. या निवडणुकीतील चुकांची पुनुरावृत्ती टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीबाबतचा निर्णय हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा आहे. महापालिका निवडणुकीत आघाडी करताना काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचा पर्याय काढला, तो तोट्याचा ठरला. त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टी भविष्यात टाळता येऊ शकतात. याचा विचार होईल.