Sat, Mar 23, 2019 16:05होमपेज › Sangli › ‘चिखलगुत्ता’ आणखी किती बळी घेणार?

‘चिखलगुत्ता’ आणखी किती बळी घेणार?

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 8:23PMसांगली : अभिजित बसुगडे

शहराच्या दक्षिणेकडील गुंठेवारीच्या विस्तारीत शामरावनगर, रूक्मिणीनगर, विनायकनगर, महसूल कॉलनीच्या समोरील परिसराचा ‘चिखलगुत्ता’ अद्यापही कायमच आहे. रुक्मिणीनगरमध्ये केवळ खराब, दलदलीच्या रस्त्यामुळे रूग्णवाहिका पोहोचू न शकल्याने एकाचा दुर्दैवी बळी गेला. आणखी किती बळी गेल्यानंतर महापालिका प्रशासन या भागातील रस्ते करणार आहे, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. या परिसरात पायाभूत सुविधांअभावी आजपर्यंत अनेक बळी गेले आहेत. त्याला जबाबदार कोण, हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.   

शंभर फुटी रस्त्याच्या दक्षिणेला विस्तारलेल्या शामरावनगर भागात अनेक उपनगरेही आहेत. शंभर फुटी रस्त्यावर महापालिकेने केलेले ड्रेनेज बारा ते पंधरा फुटांवर आहे. मात्र शामरावनगर परिसरातील ड्रेनेज वीस फुटांपर्यंत खोल नेण्यात आले आहे. मुख्य ड्रेनेजपेक्षा त्याची खोली अधिक असल्याने येथे सांडपाण्याचा निचराच होत नसल्याचे चित्र आहे. या परिसरात ड्रेनेज करताना महापालिकेच्या अधिकार्‍यांना मुख्य ड्रेनेजची खोली माहित नव्हती का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

शामरावनगरमधील बहुतेक सर्वच उपनगरांमध्ये रस्त्यांची बिकट अवस्था आहे. याचा त्रास लहान मुले, महिला आणि वृद्धांना होतो आहे. पावसाळ्यात तर गुडघाभर चिखलात वाट काढत त्यांना जावे लागते. नुकतेच या परिसरातील नागरिकांनी समस्यांची गार्‍हाणी मांडल्यानंतर या परिसरात मुरूम टाकण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. मात्र अगदी किरकोळ स्वरूपातच तेथे मुरूम टाकला जात आहे आणि त्याचेही राजकारण केले जात असल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. 

जिल्हाधिकारी काळम- पाटील यांच्या  आदेशानंतरही या परिसरात आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही.  अक्षरश: नरक यातना भोगणार्‍या नागरिकांना न्याय कोण देणार, हा खरा प्रश्‍न आहे. शामरावनगर आणि परिसरात राहणे म्हणजे काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षाही गंभीर शिक्षा असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.  महापालिकेला सुविधा देणे शक्य होत नसेल तर शामरावनगरसाठी वेगळी ग्रामपंचायत निर्माण करावी, अशी मागणीही आता जोर धरत आहे.  

त्यामुळेच तीन महिन्यांपूर्वी येथील नागरिकांनी प्रतिकात्मक चिखलवाडी ग्रामपंचायतीची स्थापना करून अनोखे आंदोलन केले होते. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर येथे अगदी किरकोळ स्वरूपात मुरूम टाकला जात आहे. तर याच मुरूमातील दगडावरून घसरून एक वृद्ध जखमी झाले होते. त्यातच त्यांचे  निधन झाले. रुग्णवाहिका न पोहोचल्याने लॉटरी व्यावसायिकाचा मृत्यू झाला. पायाभूत असुविधांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. याप्रकरणी आता महापालिकेवरच मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केल्याशिवाय नागरिकांना न्याय मिळणार नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. 

नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे

शामरावनगरच्या दक्षिणेस 60 फुटी नैसर्गिक नाल्यावर अनेक अतिक्रमणे झाली आहेत. याची सुरूवात एका हॉटेलवाल्यापासून झाली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भविष्यात संपूर्ण शामरावनगरचेच पुनर्वसन करण्याची आवश्यकता भासणार असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या अहवालात म्हटले होते.

असुविधांचे आतापर्यंत अनेक बळी...

प्राथमिक सुविधांच्या अभावामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. नुकतेच वेळेत उपचार न मिळाल्याने लॉटरी व्यावसायिकाचा मृत्यू झाला. मुरमाड रस्त्यावर पडल्याने एकाचा बळी घेतला. पाण्याचा टँकर आल्यानंतर झालेल्या वादाच्या ताणातून एका महिलेचा बळी गेला होता. सर्पदंश झालेल्या तीन वर्षाच्या बालकाला मुख्य रस्त्याला आणेपर्यंत त्याचा बळी गेला होता. तर पाण्याच्या बादलीत पडून दीड वर्षाची बालिका दगावली होती. भविष्यात ही यादी वाढण्याचीच शक्यता आहे. 

या उपनगरांमध्ये रस्त्यांचा बोजवारा...

शामरावनगरमधील अनेक उपनगरांमध्ये रस्ते चिखलमय बनले आहेत. यामध्ये विनायकनगर, रूक्मिणीनगर, विठ्ठलनगर, सिंधी पुरूषार्थ भवन परिसर, मॉडर्न कॉलनी, ज्ञानेश्‍वर कॉलनी, ज्येष्ठराज कॉलनी, श्रीराम कॉलनी, स्वरूपानंद सोसायटी, महसूल कॉलनीसमोरील परिसराचा समावेश आहे. या उपनगरामधील लोकांना मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी चिखलातूनच वाट काढावी लागते. त्यांच्या नरकयातना कधी संपणार, असा सवाल होत आहे.