होमपेज › Sangli › जीर्ण विद्युत तारांमुळे आणखी कितीजणांचा बळी?

जीर्ण विद्युत तारांमुळे आणखी कितीजणांचा बळी?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : अशोक शिंदे

वाळवा तालुक्यासह ठिकठिकाणच्या शिवारात जीर्ण झालेल्या विद्युत तारा पिकांमध्ये पडत - लोंबकळत आहेत. डीपी-ट्रान्सफॉर्मरच्या उघड्या पेट्या ठिकठिकाणी दिसत आहेत. या गंभीर  व जीवघेण्या समस्येकडे महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच येलूर (ता. वाळवा) येथे तिघांचा बळी गेला आहे. 

शिवारात विजेच्या धक्क्याने आजवर अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरवेळी पोकळ आश्‍वासने देऊन महावितरणकडून  नंतर दुर्लक्ष केले जाते. राज्य सरकार व महावितरणकडून  ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. 

वीज वाहिन्यांचे सर्वेक्षण व्हावे...

जीर्ण झालेल्या तारा तुटून  विजेचा धक्का बसून अनेक शेतकर्‍यांना  जीव गमवावा लागला आहे.  असे जीवघेणे अपघात सातत्याने होत आहेत.  परिसरातील विद्युत तारांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती  होण्याची  गरज आहे. 

वादळ, वारे व पावसाळ्याच्या काळात शिवारात-पिकांत तारा पडलेल्या असतात. त्यातून वीजपुरवठा सुरूच असतो. शेतकरी व शेतमजुरांना त्याचा अंदाज न आल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.  महावितरणकडून तारा बदलणे अथवा सुरक्षात्मक उपाययोजना मात्र अजिबात केल्या जात नाहीत. 

महावितरणचा भोंगळ कारभार...

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शिवारांमध्ये उसाचे फड  तसेच ओढ्याकाठच्या झाडांना तारांचा स्पर्श होत आहे. जीर्ण झालेल्या तारा तुटत आहेत.  प्रसंगी पाण्यातून, चिखलातून प्रवाहित झालेल्या विद्युत भाराची कल्पना नसल्याने शेतकर्‍यांना  जीव गमवावा लागत आहे. 

निरपराध शेतकर्‍यांचा बळी...

विजेच्या तारा शेतात ओढ्यावर लोंबकळत आहेत.  वार्‍याने या लोंबकळणार्‍या तारा शेतात तुटून पडतात. त्यातील विद्युतप्रवाह सुरू असतो.  शेतात पाणी पाजण्यासाठी-शेतीच्या कामासाठी जाणारे शेतकरी, शेतमजुरांचा या तारांशी संपर्क होऊन अनेकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जळक्या उसाला कोण वाली?

शेतात उभ्या असलेल्या उसाच्या फडाला काही ठिकाणी लोंबकळणार्‍या  तारा घासतात.  घर्षण होऊन ठिणग्या पडतात. त्यामुळे ऊस जळून जातो. शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. त्याची भरपाई कोणीच देत नाही. प्रत्येक गळित हंगामामध्ये अशा घटना होत असतात. 

गेल्या तीन वर्षात सांगली जिल्ह्यात सुमारे 80 ते 90 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांचा  असा बळी गेला आहे. गोटखिंडी, इस्लामपूर, वाळवा, कामेरी, बहे, येलूरसह अनेक गावांमधील शेतकर्‍यांना महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. विजेचा धक्का लागून दुर्घटना घडली तर तातडीच्या कोणत्या उपाययोजना कराव्यात,  त्या व्यक्तीला कसे वाचवावे, त्याला वाचविताना कोणती खबरदारी घ्यावी याविषयी महावितरणकडून जनजागृती व प्रबोधन  व्हायला हवे . जीर्ण विद्युत तारांच्या सद्यस्थितीचा सर्वेक्षण घेऊन तारा बदलणे गरजेचे आहे. ट्रान्सफॉर्मर-डीपी अशा ठिकाणी  सुरक्षा व्यवस्था  आवश्यक आहे. 

Tags : sangli news,  chronic, electrical, wires, issue


  •