Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Sangli › उमेदवार न मिळणारा भाजप मनपा कशी जिंकणार

उमेदवार न मिळणारा भाजप मनपा कशी जिंकणार

Published On: Jul 02 2018 1:48AM | Last Updated: Jul 02 2018 12:01AMसांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिका निवडणुकीत भाजपला उमेदवार मिळणे मुश्कील झाले आहे. ते मग निवडणूक कशी जिंकणार, असा टोला काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला. राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबत लवकर निर्णय होणार आहे. पण आघाडी नाही झाली तर स्वबळाचाही तयारी ठेवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, देश व राज्यातील भाजप सरकारच्या कारभाराविरोधात जनता प्रचंड नाराज आहे. मोठ्या अपेक्षेने भाजपला निवडून दिले पण सामान्य जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.  देशभरात झालेल्या खासदारकीचय 21 पोटनिवडणुकांत केवळ तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित ठिकाणी इतर पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. सांगली महापालिकेसाठी भाजपला उमेदवार मिळेना झाले आहेत. दुसर्‍या पक्षातील आयाराम उमेदवारांवर त्यांची भिस्त आहे. उमेदवारी देण्यासाठी लवचिकतेची भाषा वापरली जात आहे. मात्र ज्यांना उमेदवारच मिळत नाहीत ते महापालिका जिंकणार कशी, हा खरा प्रश्‍न आहे. 

ते पुढे म्हणाले, गेल्या दोन दिवसांत पक्षाने 325 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. उमेदवार निवडताना जिंकण्याची क्षमता हा निकष विचारात घेतला जाईल. तुझा, माझा उमेदवार अशी वशिलेबाजी केली जाणार नाही. निवडणूक जिंकणे हेच लक्ष्य ठेवले आहे. स्थानिक पातळीवरील सर्व नेत्यांशी चर्चा करुन यादी अंतिम केली जाईल. ही दि. 4 रोजी प्रदेशच्या बैठकीत मंजूर केली जाईल. 

राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु आहे. समविचारी पक्षांना बरोबर घ्यावे, असे प्रदेश पातळीवर ठरले आहे. त्यामुळे याबाबत दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष अंतिम निर्णय घेणार आहे. आघाडी झाली नाही तरी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.यावेळी युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्‍वजीत कदम, आमदार सतेज पाटील, काँग्रेस नेत्या  जयश्री पाटील, माजी खासदार व मंत्री प्रतीक पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अभय छाजेड, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष  विशाल पाटील उपस्थित होते. 

जनता हुशार, दलबदलूंना थारा देणार नाही

तुमच्या पक्षातील उमेदवारी नाकारलेले भाजपमध्ये जातील , यावर काय उपाय केला आहे, असे विचारले असता पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीत आयाराम-गयाराम हे चालतेच. पण आता जनता फार हुशार झाली आहे. दलबदलूपणा हे स्वार्थासाठी होत असतो, हे मतदारांना चांगले कळते. त्यामुळे दलबदलूंंना आता थारा मिळणार नाही.