Sun, Mar 24, 2019 22:56
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › हॉटेल मालकासह व्यवस्थापकाला अटक

हॉटेल मालकासह व्यवस्थापकाला अटक

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 23 2018 12:17AMसांगली : प्रतिनिधी

वाहतूक पोलिस समाधान मांटे यांचा हॉटेल आवारातून मृतदेह हलवून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकासह व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. कुमार ऊर्फ आप्प्साहेब कल्लाप्पा कुमसगे (वय 49, रा. उत्कर्षनगर), व्यवस्थापक शब्बीर बाळू नदाफ (वय 55, रा. बुधगाव) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

मंगळवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्ना डिलक्स येथे मांटे यांचा सपासप वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य संशयित झाकीर जमादारसह चौघांना यापूर्वीच अटक केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये खून झाल्यानंतर मांटे यांचा मृतदेह हॉटेलच्या आवारातच पडल्याचे दिसत होते. मात्र, हॉटेल मालक कुमसगे आणि व्यवस्थापक नदाफ यांनी त्यांचा मृतदेह हलवून हॉटेल बाहेरील फुटपाथवर ठेवला होता. याबाबत शनिवारी त्या दोघांसह हॉटेलमधील चार वेटरना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर शनिवारी कुमसगे, नदाफ यांना अटक करण्यात आली. चौकशीमध्ये या दोघांनी मृतदेह हॉटेलच्या आवारातून हलवून फूटपाथवर ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कुमसगे व नदाफ यांच्यावर खुनासह खुनातील पुरावा नष्ट केल्याप्रकऱणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

गाड्या, हत्यार सापडले नाही...

झाकीरने मांटे यांचा खुनात वापरलेले हत्यार हॉटेलजवळील एका गटारीत टाकल्याची कबुली आरोपीने दिली आहे. पोलिस शनिवारपासून त्याचा शोध घेत आहेत. मात्र, हत्यार अजूनही सापडलेले नाही. दरम्यान, खुनानंतर पळून जाण्यासाठी झाकीरने त्याची बुलेट आणि नंतर मेहुण्याच्या मोटारसायकलचा वापर केला होता. त्या गाड्याही अजून जप्त केल्या नसल्याचे पोलिस  उपअधीक्षक अशोक विरकर यांनी सांगितले.