Thu, Apr 25, 2019 21:28होमपेज › Sangli › गुंड भावशा पाटीलला अखेर अटक

गुंड भावशा पाटीलला अखेर अटक

Published On: May 12 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 11:11PMसांगली : प्रतिनिधी

खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, मारामारी यासारखे 13 गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि गेल्या आठ वर्षांपासून फरारी असलेला गुंड भावशा ऊर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (वय 38, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) याला अखेर अटक करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गुंडा विरोधी पथकाने पंढरपूर येथे ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

भावशाने 2005 मध्ये गुन्हेगारी कारवायांना सुरुवात केली. त्यानंतर त्याने 2010 मध्ये साथीदाराच्या मदतीने रेठरेधरणमधील धनाजी मोहन पाटील यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. त्यानंतर पसार झालेल्या भावशाने गावातीलच प्रकाश शहाजी पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात ते थोडक्यात बचावले होते. त्यानंतर त्याने जून 2010 मध्ये विट्यातील  गुंड संजय कांबळे याचाही खून केला होता. त्यानंतरही तो पसार झाला होता. त्यानंतर छत्तीसगड येथील एका रेल्वे स्थानकावर सांगली पोलिसांनी त्याला अटक केली होती. 

त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यावेळी धनाजी पाटील यांच्या खूनप्रकरणी त्याला इस्लामपूर येथील न्यायालयात नेत असताना न्यायालयाच्या आवारातून दि. 18 ऑक्टोबरला तो पळून गेला होता. त्यानंतर तब्बल सहा वर्षे त्याने पोलिसांना चकवा दिला होता. दि. 1 डिसेंबर 2016 रोजी त्याने पूर्ववैमनस्यातून संताजी खंडागळे यांच्या घरात घुसून सत्तूरने वार करून तसेच गोळीबार करून त्यांचा खून केला होता. 

त्यानंतर तो पसार झाला होता. या खुनानंतर मात्र पोलिस दल खडबडून जागे झाले. त्याला शोधण्याचा अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांना तो सापडला नव्हता. गेल्या आठ वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत होता.  अधीक्षक शर्मा यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुंडा विरोधी पथकाला भावशाला पकडण्याचे खास काम दिले होते. गेल्या पाच महिन्यांपासून हे पथक भावशाचा माग काढत होते. त्याच्या ठावठिकाण्याची माहिती घेत पथकाने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. 

भावशा विठ्ठलभक्त असून तो एकादशीला पंढरपूरला दर्शनासाठी येत असल्याची माहिती अधीक्षक शर्मा यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी गुंडा विरोधी पथकाने पंढरपूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून भावशाला अटक केली. त्याला कडक बंदोबस्तात सांगलीत आणण्यात आले. 

अधीक्षक शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष डोके, लक्ष्मण मोरे, महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रूपनर, सागर लवटे यांच्यासह पंढरपूर येथील हणमंत देशमुख, सुजित हुबाळे, सचिन गवळी, संदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

पथकाला बक्षीस देणार

गेल्या पाच महिन्यांपासून अथक परिश्रम घेत गुंडा विरोधी पथकाने भावशाचा माग काढून त्याला अटक केली. आठ वर्षांपासून तो फरारी होता. त्याला अटक केल्याने अनेक गुन्हे टळणार आहेत. शिवाय त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येणार आहेत. त्यामुळे या पथकाला बक्षीस देणार असल्याचेशर्मा यांनी यावेळी सांगितले. 

धर्मशाळेत वास्तव्य

भावशाने मसाज करीत असल्याचे सांगत पंढरपूर येथील धर्मशाळेत मुक्काम ठोकला  होता. विठ्ठलाचा भक्त असल्याने त्याने गळ्यात तुळशीमाळा घातल्या आहेत.  तो पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणालाच संशय आला नव्हता. मात्र पोलिसांनी त्याला अखेर पकडलेच. 

भावशावर 3 खुनांसह 13 गंभीर गुन्हे

भावशाने 2005 मध्ये गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या. सुरुवातीला त्याच्याविरोधात गाड्या चोरीचे सहा गुन्हे इस्लामपूर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याशिवाय याच वर्षात मारहाणीचा गुन्हाही त्याच्यावर दाखल करण्यात आला होता. 2006 मध्ये पहिल्यांदा त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर 2010 मध्ये दोन व 2016 मध्ये एक असे खुनाचे तीन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.