Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Sangli › होळकर चौक, मंगळवार बाजारातील रस्ते धोकादायक

होळकर चौक, मंगळवार बाजारातील रस्ते धोकादायक

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 8:19PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिंदे मळा चौक, अहिल्याबाई होळकर चौक, मंगळवार बाजार आदी ठिकाणी लाखो रुपये खर्चून चकाचक रस्ते करण्यात आले. मात्र, आता अवघ्या सहा महिन्यांत ते रस्ते खराब झाले आहेत. अहिल्याबाई होळकर चौक तर पूर्णपणे धोकादायक बनला आहे. असे रस्ते तयार करणार्‍या संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून त्यांच्याकडून पुन्हा रस्ते तयार करून घेण्याची मागणी होत आहे. 

संजयनगर, अभयनगर, शिंदे मळा, राजीव गांधीनगर आदी विस्तारित भागात सहा महिन्यांपूर्वी रस्ते करण्यात आले होतेे. परंतु  पावसाळा सुरू झाला, तसे या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली. मुळात हे रस्ते करतानाच निकृष्ट काम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकेका दिवसात एकेक रस्ता पूर्ण करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे रस्ते पूर्णपणे निकृष्ट झाले आहेत.

अहिल्याबाई होळकर चौकातील चारही रस्त्यांचे डांबरीकरण केलेले होते. मात्र, आता संजयनगरकडे जाणार्‍या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे वाहून गेले आहे. खालची खडी वर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी रस्ता विभाजकामध्ये  झाडे लावण्यात आलेली आहेत. सर्वच झाडांना ट्री गार्ड बसविण्याची मागणी होत आहे.

होळकर चौकापासून जुन्या कुपवाडकडे जाणार्‍या रस्त्यावर पाईपलाईन बसविताना तयार झालेल्या रस्त्यांची खोदाई करून मुरूम आणि दगड त्याच ठिकाणी टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर जणू लहानशी टेकडीच  झाली आहे. यातून येथे अपघात होत आहेत.

राजीव गांधीनगर येथे मंगळवारी आठवडा बाजार भरतो. मात्र, या रस्त्यावर चेंबर उघडे पडले आहेत. यातून दुर्गंधीयुक्‍त पाणी वाहत असते. रात्रीच्या अंधारात या रस्त्यावर या चेंबरला वाहने धडकून लहान-मोठे अपघात होत आहेत. आठवडा बाजारावेळी तर चेंबरमध्ये  मुले पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मंगळवार बाजाराच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला रस्ता निकृष्ट झाल्यामुळे त्याची रुंदी कमी होत आहे. याच रस्त्यावर मुख्य चौकापासून ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा 100 फुटी रस्ता आहे. या ठिकाणी लोकवस्ती झालेली आहे. परंतु हा रस्ता वादात असल्यामुळे  पालिकेने या  रस्त्याकडे  दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर काटेरी झुडपे, गवत उगवते, त्यामुळे साप, डुकरे, भटक्या कुत्र्यांचा इथे सुळसुळाट झालेला आहे. 

निकृष्ट रस्त्यांना कोण जबाबदार?

निवडणुकीपूर्वी शहरातील सर्व रस्ते चकाचक करण्यात आले होते. परंतु त्यांचे आयुष्य सहा महिनेही टिकले नाही. खर्च मात्र कोट्यवधींच्या घरात झालेला आहे. असे असताना या निकृष्ट रस्त्यांच्या कामांना कोण जबाबदार असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. या रस्त्यांची भरपाई संबंधित ठेेकेदारांकडून करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा चिखलातूनच प्रवास करावा लागत आहे. नागरिक संतप्त झाले असून महापालिकेच्या पहिल्या सभेवेळीच आंदोलन करण्याची भूमिका नागरिक घेत आहेत.