सांगली : प्रतिनिधी
येथील हिराबाग वॉटरवर्क्स जलशुद्धीकरण केंद्राचे गाळ काढण्याचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत या केंद्रातून सांगली, सांगलीवाडीचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता शीतल उपाध्ये यांनी सांगितले. ते म्हणाले, माळबंगला तसेच हिराबाग वॉटरवर्क्स येथून सांगली, कुपवाडला पाणीपुरवठा होतो. दरम्यान, हिराबाग येथील जलशुद्धीकरण केंद्रात गाळ काढणे आणि अन्य दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. हे काम शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत चालेल. परिणामी, या केंद्रातील पाणीउपसा आणि पुरवठा बंद राहणार आहे. उपाध्ये म्हणाले, या केंद्रातून गावभाग, खणभाग, नळभाग, गणपती पेठ, शामरावनगर, कोल्हापूर रस्ता, सांगलीवाडी आदी भागांत शुक्रवारी पाणीपुरवठा ठप्प राहील.
हिराबाग येथून जलभवन येथे पाणीपुरवठा होतो. त्या टाकीतून विश्रामबाग, गव्हर्मेंट कॉलनी आदी भागात पाणीपुरवठा होतो. त्या भागातही शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील.