सांगली : प्रतिनिधी
साखर कारखानदारांनी ठरल्याप्रमाणे उसाची पहिली उचल 3000 रुपयेच द्यावी, अन्यथा प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या फोडण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.
या मागणीसाठी शनिवार, दि. 17 रोजी कोल्हापूर येथे साखर सहसंचालक कार्यालयावर निघणार्या मोर्चात ऊस उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
चालू गळीत हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे एफआरपी+200 रुपये अशी पहिली उचल द्यायचे कारखानदारांनी मान्य केले होते. मात्र आता साखरेचे दर कमी झाले आहेत, याकडे बोट दाखवून 2500 रुपयांचीच पहिली उचल द्यायची निर्णय घेतला आहे. याला विरोध करीत तीन हजार रुपयांचीच पहिली उचल द्यावी या मागणीसाठी 17 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख म्हणाले, हंगाम सुरू होताना 3000 ते 2900 रुपयांची पहिली उचल देण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता साखर दर कमी झाले आहेत, असे सांगत कारखानदारांनी 2500 रुपयांची पहिली उचल देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटना हे कदापी मान्य करणार नाही. गाळपासाठी तुटून गेलेल्या उसाची डिसेंबरपासूनची बिले अद्याप मिळालेली नाहीत. ती व्याजासह द्यावीत अशी मागणी या मोर्चाच्या वेळी करण्यात येणार आहे. यासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येईल.
ते म्हणाले, मध्यंतरी अनेक कारखान्यांचे वजनकाटे बरोबर असल्याचे जाहीर करण्यात आले, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना या काट्यांचे ‘क्रॉस चेकिंग’ करणार आहे.
पंचवीसशे रुपयांच्या पहिल्या उचलीने सोसायटीचे कर्ज देखील भागणार नाही, अशी स्थिती असल्याची टीका करुन देशमुख म्हणाले, सरकार मात्र पाकिस्तानमधून साखर आयात करीत आहे. वास्तविक पाहता ऊस उत्पादक शेतकर्यांची कर्जे लाखो रुपयांची आहेत. जर त्यांना आर्थिक संकट आले तर विदर्भ-मराठवाड्यासारखे पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्याखेरीज राहणार नाही. ठरल्याप्रमाणे कारखानदारांनी 3000 रुपयांची पहिली उचल द्यावी, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका उडेल.
सयाजी मोरे म्हणाले, तांबवे येथे सोसायटीचे कर्ज थकले म्हणून भूपाल लोखंडे या शेतकर्याने आत्महत्या केली आहे. बागायती टापूत देखील शेतकरी आत्महत्या करू लागला आहे, याला केवळ सरकारचे धोरण जबाबदार आहे.
संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे म्हणाले, तीन हजारची पहिली उचल दिली नाही तर प्रसंगी सांगली जिल्ह्यात एकाही मंत्र्यांची गाडी फिरू देणार नाही. यावेळी महावीर पाटील, भागवत जाधव, जयकुमार कोले यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.