Thu, Jul 18, 2019 12:17होमपेज › Sangli › वैशाख वणव्याने जिल्ह्याची होरपळ

वैशाख वणव्याने जिल्ह्याची होरपळ

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:27PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिक सध्या वैशाख वणव्याचा अनुभव घेत आहेत. जिल्ह्यात सोमवारी बहुतांश ठिकाणी तापमानाने चाळिशी ओलांडल्याचे पाहायला मिळाले. बहुतांश तालुक्याच्या ठिकाणी सरासरी 40 ते 41 अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. पुढील आठवड्यातही हा कडाका 42 पर्यंत जाण्याची  शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी ओलांडली आहे.  वार्‍याचा वेग केवळ 8 ते 11 किलोमीटर आहे. हवेतील आर्द्रता 12 ते 15 टक्के आहे. या आठवड्यातही उष्णतेची लाट कायम  आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत सकाळी 11 वाजल्यानंतर उन्हाचा मोठा चटका जाणवत आहे. त्यामुळे बहुतांश लोक 11 च्या आत कार्यालयात पोहोचत आहेत. दुपारच्या वेळी कार्यालयातून बाहेर पडण्यास कोणीच धजावत नाहीत. आवश्यक काम असले तरच काहीजण टोपी, गॉगल, सन कोट, सन्स क्रीम याचा वापर करुन बाहेर पडत आहेत. भर दुपारी सांगली, मिरज शहरातील रस्ते सुनसान भासत आहेत. घरातही उकाडा असल्याने पंखे, एसीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  वाढत्या उन्हामुळे  शीतपेयांना मागणी वाढली आहे. 

ग्रामीण पारा 41 च्या वर जात आहे. त्यामुळे शेतकरी व मजूर शेती कामासाठी सकाळी लवकरच जाऊन 12 वाजेपर्यंत काम आटोपून घरी परतत आहेत. उन्हाच्या जोरदार तडाख्यामुळे जनावरांचे हाल  व पिकांची होरपळ सुरू आहे. 

पुढील आठवडाभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमानाचा पारा 41 ते 42 अंश स. च्या आसपास राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

उष्माघातापासून वाचण्यासाठी उष्माघात म्हणजे काय? 

जादा वेळ उच्च तापमानात रहावे लागल्यास उष्माघाताचा त्रास होतो. यात शरीरातील पाण्याची पातळी कमी  होते. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणाच बंद पडते. शरीराचे मूळ तापमान 104 एफहून अधिक होते.  यामुळे शरीरातील मज्जासंस्थेत गुंतागुंत निर्माण होते. मळमळणे, झटका येणे, शुद्ध हरपणे असे त्रास होतात. काही वेळा रुग्ण कोमामध्येही जाऊ शकतो. चक्कर येणे हे यातील पहिले लक्षण आहे. तसेच डोकेदुखी, सुस्ती आणि डोके हलके झाल्यासारखे वाटणे, गरम होत असतानाही घाम न येणे, त्वचा लालसर, गरम आणि कोरडी पडणे, अशक्तपणा येणे, उलट्या, हृदयाचे ठोके वाढणे, वेगाने आणि उथळ श्वासोच्छवास असे प्रकार होतात.

 उपचार 

1. त्या व्यक्तीला तात्काळ हॉस्पिटलला घेऊन जा. 2. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाला थंड जागेत न्या. 3. त्यांना आडवे झोपवा आणि पाय एका ठराविक उंचीपर्यंत वर करून ठेवा. 4. रुग्ण शुद्धीत असेल तर  रिहायड्रेशन ड्रिंक्स द्या. 5. रुग्ण बेशुद्ध झाला असेल तर जवळच्या डॉक्टरांकडे नेऊन सलाईन लावा. 6. आईस पॅक, स्प्रे किंवा थंड पाण्याने स्पंजिंग करून शरीराचे तापमान कमी करा.  

Tags : Sangli, Miraj city, Highest, temperature, record,