Mon, May 27, 2019 07:03होमपेज › Sangli › सव्वालाखी आष्ट्यात हळदीचे उच्चांकी उत्पादन

सव्वालाखी आष्ट्यात हळदीचे उच्चांकी उत्पादन

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 8:27PMसांगली : विवेक दाभोळे

बागायती शेतकर्‍यांसाठी  मोठी संधी असलेल्या हळद पिकाचे वारणा टापूत वाढते आकर्षण आहे. आष्टा येथे योगेश शांतीकुमार चौगुले यांनी 113 गुंठ्यात 117 क्विंटल सेलम हळदीचे उत्पन्न घेतले. एकरी 3 लाख 66 हजार रु. चे उत्पादन घेत चौगुले यांनी  आदर्शवत उदाहरण ठेवले आहे. 

आष्टा येथे तासगाव मार्गावर चांदोली वसाहतीनजीक चौगुले यांचा मळा आहे. या ठिकाणी फोंड्या माळावर चौगुले यांनी मोठ्या जिद्दीने शेती पिकविली आहे. त्यांची घरची 13 एकर शेती. जिरायती शेती असल्याने शेती फायद्याची ठरत नव्हती.  यामुळे काही काळ त्यांनी पोल्ट्री व्यवसाय केला. पुढे सन 2002 मध्ये त्यांनी शेतीत विहीर खोदत शेती बागायती केली. त्यांनी काहीकाळ उसाचे उत्पादन देखील घेतले. मात्र त्यातून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यातून ते हळद पिकांकडे वळले. सन 2015-16 मध्ये त्यांनी हळदीची सेलम जातीची लागवड केली. त्यांना दोन एकरमध्ये अवघे 34 क्विंटल उत्पन्न मिळाले. 16-17 मध्ये 100 गुंठ्यात 76 क्विंटल उत्पन्न मिळाले.

शेतीत उत्पन्न वाढीसाठी योगेश चौगुले यांचे प्रयत्न सुरू असतानाच आष्टा येथे हळद पीक शिबिरात त्यांना अधिक मार्गदर्शन मिळाले. यातील सूचनांनुसार त्यांनी शेतीची उभी आडवी नांगरट करून साडेचार फुटी सरी सोडली. शेणखत विस्कटले. 9 ते 10 इंचावर झिगझॅग पध्दतीने हळदीची लागवड केली, ठिबकने पाण्याची व्यवस्था केली. शिस्त ठेवल्याने पीक चांगले जमले. यासाठी त्यांना बिभीषण पाटील, वडील शांतीकुमार, आजोबा बाळासाहेब चौगुले, काका आणि कुटुंबियांचे मार्गदर्शन लाभले.  

हळदीचे गणित 

सेलम हळद बियाणासाठी 36 हजार, रासायनिक व सेंद्रीय खतांसाठी 16 हजार 500, भांगलण 16 हजार, पूर्वमशागत 7 हजार, आंतरमशागत 3400 व हळद काढणी आणि शिजवणे यासाठी 6274 रुपये असा एकरी 1 लाख 35 हजार 174 रुपयांचा खर्च आला. त्यांना 113 गुंठ्यात 117 क्विंटल हळदीचे उत्पादन मिळाले.  याचे बाजारभावाप्रमाणे 10 लाख 36 हजार 660 रुपये मिळाले. एकरी 3 लाख 66 हजार 994 रु. उत्पन्न मिळालेे, यातून 1 लाख 35 हजार 174 रुपयांचा खर्च वजा जाता 2 लाख 31 हजार 820 रु. निव्वळ फायदा.

Tags : Ashta, High production, turmeric, sangli news,