Fri, Jan 18, 2019 07:06होमपेज › Sangli › सांगलीत चेंजिंग रूममध्ये छुपा मोबाईल कॅमेरा

सांगलीत चेंजिंग रूममध्ये छुपा मोबाईल कॅमेरा

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 06 2018 1:03AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील राममंदिर रस्त्यावर असणार्‍या प्राची डायग्‍नोस्टिक सेंटरमधील  महिलांच्या चेंजिंग रूममध्ये छुपा मोबाईल कॅमेरा रंगेहाथ पकडण्यात आला. याप्रकरणी रुग्णालयातील एक्स-रे टेक्निशियन सूरज गुडूलाल मुल्ला (वय 26, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जमावाने संशयिताला बेदम चोप दिला. 

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेने शंका आल्याने पतीला बोलावून घेऊन तपासणी केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने फिर्याद दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटल ते राममंदिर रस्त्यावर डॉ. प्रसाद चिटणीस यांचे प्राची डायग्‍नोस्टिक सेंटर  आहे. येथे एक्स-रे, सोनोग्राफी, रक्‍तासह अन्य घटकांची तपासणी करण्यात येते. 

सोमवारी दुपारी शहरातील एक महिला तपासणीसाठी या सेंटरमध्ये आली होती. तपासणीनंतर कपडे बदलण्यासाठी ती महिला चेंजिंग रूममध्ये गेली. त्यावेळी तिला डिस्पोजेबल सिरिंज बॉक्स हलताना आढळून आला. शिवाय, त्यामध्ये एक मोबाईल व्हायब्रेट होत असल्याचे जाणवले. 

त्यामुळे घाबरलेल्या महिलेने पतीला चेंजिंग रूममध्ये बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी तो डिस्पोजेबल सिरिंजचा बॉक्स उघडून पाहिला असता त्यामध्ये कॅमेरा सुरू असलेल्या स्थितीत एक मोबाईल तेथे आढळून आला. त्यामुळे चिडलेल्या दाम्पत्याने याबाबत रूग्णालयातील कर्मचार्‍यांना जाब विचारला. तसेच त्या मोबाईलबाबत चौकशी केल्यानंतर तो सूरज मुल्लाचा असल्याचे समजले. 

हा प्रकार समजल्यानंतर या रूग्णालयात गर्दी जमली. मुल्ला चेंजिंग रूममध्ये मोबाईल कॅमेरा ठेवून व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत असल्याचे समजल्यानंतर जमावाने त्याची यथेच्छ धुलाई केली. यावेळी जमावाने याबाबत डॉ. चिटणीस यांनाही जाब विचारला. परिस्थिती चिघळत चालल्याचे पाहून त्यांनी विश्रामबाग पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

त्यानंतर मुल्लाला जमावाच्या तावडीतून सोडवून पोलिसांनी मोबाईलसह त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पीडित महिलेच्या पतीने याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.