तासगाव : दिलीप जाधव
केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने अध्यादेश काढण्यात आला आहे. यानुसार सांगली जिल्ह्यात दहा हेलिपॅड तयार करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक तहसीलदार कार्यालयाने संबंधित कागदपञासह सविस्तर अहवाल तयार करुन पाठवावेत असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी दिले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे हेलिपॅड धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी हेलिपॅड करण्यासाठी नियोजन करुन जागा निश्चित करावी. याचा अहवाल मुंबई येथील विमानचालन संचालनालयाच्या संचालकांना पाठवावा असा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
यानुसार सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, विटा, कडेगाव, पलूस, वाळवा आणि शिराळा या दहा ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड तयार करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पोलीस परेड मैदान किंवा खुले मैदान अशा ठिकाणांची पाहणी करुन जागेच्या कागदपञासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात यावा असे आदेश तहसीलदार कार्यालयांना देण्यात आले आहेत.