Wed, Jul 24, 2019 07:49होमपेज › Sangli › धरण परिसरात धुवाँधार

धरण परिसरात धुवाँधार

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 11:42PMसांगली : प्रतिनिधी

धरण परिसरात धुवाँधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातही आज दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे धरणे 40 टक्क्यांच्या आसपास भरली आहेत. तसेच कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. अनेक  बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाऊस असाच सुरू राहिला तर सोमवार सायंकाळपर्यंत काही छोटे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून चांगला पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून पाऊस धुवाँधार बरसत आहे. दररोज अतिवृष्टी होत आहे. शनिवार ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत (गेल्या 24 तासांत) कोयनानगरला 90,  नवजाला 125  व महाबळेश्‍वरला 96 मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचा जोर 

वाढल्याने धरणाची पाणी पातळी पाच फुटाने वाढली आहे. कोयना जलाशयाची पाणी पातळी 2096.10 फुटाच्या आसपास गेली आहे. जलाशयात प्रतिसेकंद 35 हजारापेक्षा जादा क्युसेक पाण्याची आवक होत आहे. परिणामी मागिल चोवीस तासात पाणी साठ्यात मोठा फरक पडला. धरणात रविवारी सकाळी पाणी पातळी 41.76 टीएमसी (40 टक्के) होती. सायंकाळी ते 42 पर्यंत पोहोचले.  सोमवारपर्यंत यात आणखी दोन टीएमसीची  वाढ होऊन पाणीसाठा 45 टीएमसीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.याबरोबरच धोमला 46 मिमी पाऊस पडल्याने  या धरणाचा पाणीसाठा 4.50 टीएमसी (34 टक्के), कण्हेर येथे 28 मिमी पावसाची नोंद झाल्याने धरण 3.70 टीएमसी (35 टक्के) भरले आहे. चांदोली धरण परिसरातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे  हे धरण 21 टीएमसी (60 टक्के) भरले आहे. हे धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातही कालपासून सुरु झालेला पावसाचा जोर आज (रविवारी)  कायम होता. पश्‍चिम भागातील शिराळा, वाळवा, पलूस   या  तालुक्यात  दमदार पाऊस पडला. कडेगाव, सांगली, मिरज  येथे  दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. धरण परिसर, सातारा जिल्हा व जिल्ह्यातील नदी काठी पावसाचा जोर असल्याने कृष्णा, वारणा  नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कृष्णा नदीच्या पातळीत आज दिवसभरात दीड ते दोन फूट वाढ झाली. बहे पुलाजवळ  8  फूट, ताकारीजवळ 14.15  भिलवडीत 9.5  व  सांगलीतील आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 10.5 फूट आहे. अंकली पुलाजवळ पाणी 11.10 फुटापर्यंत वाढले आहे. सोमवार सायंकाळपर्यंत यात आणखी दोन  फुटांनी वाढ होवून छोटे पूल पाण्याखाली  जाण्याची  शक्यता  आहे.  

तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ येथे अधूनमधून लहान-मोठ्या सरी येत होत्या. जत, आटपाडीत  काही ठिकाणी हलका पाऊस पडला. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील पिके तरारु लागली आहेत. सोयाबीन, भुईमूग,  ऊस, केळी, हळद  या पिकांची जोमदार वाढ होऊ लागली आहे. शिवारात शेती कामांची धांदल उडाली आहे. पश्‍चिम भागात आडसाली ऊस लागवडीचा धडाका सुरु आहे.