Sun, May 26, 2019 08:37होमपेज › Sangli › सांगली, मिरजेसह जिल्ह्यात जोरदार पाऊस

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात जोरदार पाऊस

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 11 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरजेसह तासगाव, शिराळा या परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे पाऊण तास पाऊस झाला. सांगली शहरात जोरदार वादळ आणि गारांच्या वर्षावासह सायंकाळी पाऊस झाला. मिरज तालुक्यातील कळंबी परिसरात वादळामुळे अंगणवाडीवरील पत्रे उडाले. मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, तासगाव, शिराळा आणि खानापूर, जत तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. 

सांगली शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गारांसह जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी तळे साचले होते. स्टेशन चौक, बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. भाजी मंडईत पाणी शिरल्याने विक्रेत्यांची तारांबळ उडाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरही पाणी साठले होते. कुपवाडमध्ये वादळी वार्‍याने पंचकल्याण महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या सभा मंडपाचे व भोजन मंडपाचे किरकोळ नुकसान झाले. रामकृष्णनगर, हमालवाडीतील काही घराचे पत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

मिरजेत सायंकाळी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. पूर्वभागातील कळंबी येथे वादळी वार्‍यामुळे अंगणवाडीवरील पत्रे उडून गेले. आरग परिसात वादळी वार्‍यासह तुरळक पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे आठवडा बाजारात विक्रेत्यांची पळापळ झाली. लिंगनूर, सलगरे, जानराववाडी, बेळंकी परिसरात जोरदार पाऊस झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, देशिंग, खरशिंगमध्ये जोरदार पाऊस झाला. 

शिराळा तालुक्यातील कोकरूड परिसरात शेडगेवाडी, बिळाशी, मांगरूळ आदी परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. जत तालुक्यात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्यामुळे काही गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.. येळवी, खैराव, निगडी, बिळूर, लोहगाव, वळसंग, आवंढी आणि  जत शहरात तुरळक पाऊस झाला. 

येळवीत शंकर कृष्णा आवटे यांच्या  अंगणातील झाडाखाली बांधलेल्या दोन शेळ्यांवर वीज पडल्याने त्या ठार झाल्या. अनेक   घरावरचे पत्रे , कौले उडाली.  चिकू ,डाळिंब,आंब्यांचे  वार्‍यामुळे मोठे नुकसान झाले. आवंढीत मंडाबाई शिवाजी देशमुख यांच्या पायावर छपराची मेढ पडल्याने त्यांचा पाय मोडला.