Mon, Nov 19, 2018 21:02



होमपेज › Sangli › व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घ्यावी

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घ्यावी

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 1:27AM

बुकमार्क करा




सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणातील संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांबाबत येथील न्यायालयात सुनावणी सुरू आहे.  प्रत्येक सुनावणीवेळी संशयितांना कळंबा कारागृहातून सांगलीत आणावे लागते. त्यामुळे पोलिस प्रशासनावर ताण पडत आहे. त्याशिवाय हे प्रकरण संवेदनशील असल्याने याप्रकरणाची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात यावी, असे पत्र पोलिस प्रशासनाने प्रधान जिल्हा न्यायाधीशांना पाठविले आहे. त्यावर 1 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

या प्रकरणातील संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांना सध्या कळंबा येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे. दर पंधरा दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर सुनावणी घेण्यात येते. त्यावेळी संशयितांना सांगलीतील न्यायालयात हजर करावे लागते. त्यांना कळंबा कारागृहातून सांगलीत आणून परत सोडण्यासाठी पोलिस प्रशासनाला अतिरिक्‍त मनुष्यबळ वापरावे लागत आहे. त्याशिवाय हे प्रकरण संवेदनशील असल्याने तसेच कळंबा ते सांगली अंतरही अधिक असल्याने पोलिसांवर त्याचा ताण पडत आहे. 

याबरोबरच कामटेसह संशयितांचा नातेवाईकांना भेटण्याचा प्रयत्न नेहमीच सुरू असतो. दि. 19 रोजी झालेल्या सुनावणीनंतर कोल्हापूरला जात असताना त्याचा नातेवाईकांना भेटण्याचा प्रयत्न फसला होता. त्याबाबत दै. पुढारीने वृत्त दिले होते. पोलिसांवर पडणारा ताण तसेच पुढारीने केलेली पोलखोल यामुळे पोलिस प्रशासनाने आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यासाठी प्रधान जिल्हा न्यायाधिशांना पत्र देण्यात आले आहे. कामटेसह साथीदारांना सुनावणीसाठी 1 जानेवारीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याचवेळी पोलिसांच्या पत्राबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.