Thu, Apr 25, 2019 07:28होमपेज › Sangli › जिल्हा बँकेकडील 15 कोटींच्या नोटांसंदर्भात बुधवारी सुनावणी

जिल्हा बँकेकडील 15 कोटींच्या नोटांसंदर्भात बुधवारी सुनावणी

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 10:59PM
सांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्हा बँकेकडे नोटाबंदीपूर्वी जमा असलेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जमा करून घेण्यासंदर्भात जिल्हा बँकेच्या याचिकेवर बुधवारी (दि. 5) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, वर्धा, नागपूर, अमरावती, नाशिक या आठ जिल्हा बँकांकडील 112 कोटींचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. 

केंद्र शासनाने दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी  पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार जिल्हा बँकांनी दि. 10 ते 13 नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारल्या होत्या. 

जिल्हा बँकांकडील या नोटा स्विकारण्यास ‘आरबीआय’ने टाळाटाळ सुरू केली. त्याविरोधात जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘आरबीआय’ने या नोटा स्विकारण्यास सहमती दर्शवली.  त्यानंतर आरबीआयने अधिसुचना काढत दि. 10 ते 13 नोव्हेंबर या  कालावधीत जमा झालेल्या नोटा स्वीकारल्या. मात्र दि. 8 नोव्हेंबर 2016 अखेर जिल्हा बँकात शिल्लक पाचशे, हजाराच्या नोटा स्विकारण्यास ‘आरबीआय’ने नकार दर्शविला. नाबार्डने पत्र काढून 8 जिल्हा बँकांचे 112 कोटी रुपये बुडीत ठरवले आहेत. त्याविरोधात बँकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर 5 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे समजते.