Sat, Mar 23, 2019 18:51होमपेज › Sangli › आरोग्य सहायकाचा वायफळेत खून

आरोग्य सहायकाचा वायफळेत खून

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 07 2018 1:06AMतासगाव : प्रतिनिधी

बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेले आरोग्य सहायक राजेश परशुराम फाळके (वय 54) यांचा गुरुवारी पहाटे सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मंगळवारी रात्री त्यांच्यावर हल्ला झाला होता. या खूनप्रकरणी युवक राष्ट्रवादीचे तासगाव तालुकाध्यक्ष आणि वायफळेचे ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील यांना कराड येथून पोलिसांनी अटक केली. ग्रामपंचायत निवडणुकीतील वादातून हा खून झाल्याचे तासगाव पोलिसांनी सांगितले. संशयित पाटील याची पदावरून आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांनी दिली.

याप्रकरणी राजेश फाळके यांचा मुलगा विश्‍वजित फाळके याने बुधवारी रात्री तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार राजेश पाटील याच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी व  प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विश्‍वजित फाळके याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी रात्री राजेश पाटील व त्याच्या वडिलांमध्ये भिवघाट रस्त्यालगत असणार्‍या  ढाब्यावर किरकोळ बाचाबाची झाली होती. त्यावेळी राजेश पाटील याने ‘ग्रामपंचायत निवडणुकीत तुमचा समाज आमच्या मागे का उभा राहिला नाही’ असा जाब विचारत  वडिलांना लाथा - बुक्क्यांनी जबर मारहाण केली होती.  त्या मारहाणीत फाळके यांच्या बरगड्या मोडल्या होत्या. त्यांना  सांगलीच्या  शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. 

दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच फाळके यांचे कुटुंबीय आणि समाजबांधव आक्रमक झाले. शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. संशयित राजेश पाटील याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला. त्यामुळे रुग्णालय आवारात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 

पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी संशयिताला लवकर अटक करू, असे आश्‍वास दिले. मात्र तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर दुपारी दोन वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने पाटील याला कराड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर कुटुंबीयांनी फाळके यांचा मृतदेह ताब्यात घेतला.  सायंकाळी तणावपूर्ण वातावरणात वायफळे येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले.