होमपेज › Sangli › हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार : ना. खोत

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार : ना. खोत

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 11:28PMऐतवडे बुद्रूक : वार्ताहर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणूक लढवणार आहे, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले.  वाळवा तालुक्यातील देवर्डे येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री विनय कोरे अध्यक्षस्थानी होते. आमदार शिवाजीराव नाईक, केरू पाटील, श्रीनिवास डोईजड, रेखा पाटील, भाग्यश्री पाटील,  युवराज यादव उपस्थित होते.

ना. खोत म्हणाले, वाळवा- शिराळा मतदार संघात विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे भागाचा कायापालट होत आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय पेयजल योजनांसाठी 250 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ती कामे  गतीने सुरू आहेत. एकही गाव विकासा पासून वंचित राहणार नाही.

ते म्हणाले, जलयुक्‍त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, पाणीपुरवठा अशा अनेक योजनांसांठी निधी कमी पडू देणार नाही. एफआरपीनुसार 12 टक्के साखर उतार्‍याला कारखानदारांना 3 हजार 300 रूपये देण्यास भाग पाडू . 

विनय कोरे म्हणाले,  शिराळा- वाळवा विधानसभा मतदार संघात आजपयर्ंत तीन आमदार आणि एक मंत्री असा इतिहास आहे. 14 व्या वित्त आयोग ही संकल्पना अस्तित्वात आल्यामुळे आता विकासकामांसाठी निधी कमी पडत नाही. 

आमदार  नाईक म्हणाले,   मतदार संघात 150 गावे आहेत. मंत्री  खोत यांनी राष्ट्रीय पेयजल योेजनांसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. त्याचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये.  गाव ओढ्यावरील पूल, नूतन ग्रामपंचायत इमारती यासह विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे आणि  ग्रामस्थ उपस्थित होते. प्रताप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.