Thu, Jul 18, 2019 00:22होमपेज › Sangli › सर्वपक्षीयांचा रात्रीचा दिवस

सर्वपक्षीयांचा रात्रीचा दिवस

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 09 2018 1:05AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आता तीन दिवसच उरले आहेत. परंतु, ऑनलाईन अर्ज भरण्याची सक्‍ती असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवार याद्या निश्‍चिती, आघाडी, युतीचा फैसला रविवारी रात्रीपर्यंत होणे अत्यावश्यक होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी रात्री उशिरापर्यंत बैठकांवर बैठका सुरूच ठेवत रात्रीचा दिवस केला होता. परंतु, मध्यरात्रीपर्यंत काही तोडगा निघाला नव्हता. 

वारंवार सर्व्हेतून आलेल्या प्रबळ ‘विनिंग’ उमेदवारांसाठी प्रसंगी अनेक विद्यमान आजी-माजी नगरसेवकांच्या उमेदवारीलाही कात्री लावण्याची तयारी सुरू होती. दुसरीकडे जागावाटपात न जमल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वबळाचा दवा करीत ताणाताण सुरू होती. भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समितीनेही उमेदवार ठरविण्यासाठी व्यूहरचना करीत रात्र जागविली. यातून आता सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अर्ज भरण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी आघाडीची घोषणा केली आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून जागावाटपासाठी स्थानिक नेते, दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष तसेच पार्लमेंटरी 

बोर्डासमोर याबाबत चर्चेच्या बैठका पार पडल्या. तरीही निर्णय झाला नव्हता. काँग्रेसकडून 50 तर राष्ट्रवादीकडून 35 जागांशिवाय तडजोड नाही असा पवित्रा घेण्यात आला आहे. शिवाय सांगलीवाडी, कुपवाड तसेच मिरजेतील दोन प्रभागांमध्ये दोन्हीकडून तुल्यबळ उमेदवार आहेत. त्या जागांबाबत काही तडजोड होत नव्हती. एकीकडे दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने शिवाय एकच प्रभागात प्रबळ नगरसेवक इच्छुक असल्याने थांबवायचे कोणाला, असा प्र्रश्‍न निर्माण झाला होता. 

यासंदर्भात रविवारी दोन्ही शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, संजय बजाज यांनी आपापल्या स्थानिक नेत्यांना घेऊन प्रभागनिहाय उमेदवार निश्‍चितीसाठी छाननी केली. काही ठिकाणी तर आजी-माजी पदाधिकार्‍यांनाही थांबविण्याची तयारी सुरू होती. त्यामुळे कोणाचा पत्ता काटायचा, कोणाच्या सौभाग्यवतींना चाल द्यायची यासाठीही काही पदाधिकार्‍यांनी मनधरणी सुरू ठेवली होती. दरम्यान, याद्या निश्‍चितीसाठी एकीकडे काँगे्रेस पदाधिकार्‍यांची तर राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. दोन्ही पक्षाकडून जागवाटपात तडजोडीसाठी तयारी दर्शविण्यात आली नव्हती. त्यामुळे स्व:बळावर लढण्यासाठी सर्वच 78 जागांवर अर्ज भरू असा सूर पुढे आला.दरम्यान, रात्री उशिरा जयंत पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, संजय बजाज, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, पृथ्वीराज पाटील, नेत्या जयश्री पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांच्या नेत्यांची रात्री उशिरा बैठक सुरू झाली. परंतु चर्चेतून उशिरापर्यंत आघाडीचा तोडगा काही निघाला नव्हता. 

आता बुधवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक असल्याने त्यासाठी सोमवार आणि मंगळवार दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आघाडीबाबत चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच ठेवत दोन्हीकडून प्रबळ दावेदारांचे अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला.  आघाडीचा फैसला झालाच तर त्यातून कोणाचे अर्ज मागे घ्यायचे हा ज्या-त्यावेळी फैसला करू, अन्यथा समोरासमोर लढू असाही निष्कर्ष पुढे आला. 

भाजपकडूनही आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्या जोडीला आता खासदार संजय पाटील मैदानात उतरले. त्यांनीही माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार यांच्यासोबत अनेक ठिकाणी बैठका घेऊन खलबते सुरू ठेवली होती. इच्छुकांचे मूल्यमापन करून आहे त्यातून काहीजणांना संधी देण्याचा सूर पुढे आला. सोबतच  काँगे्रेस-राष्ट्रवादीकडून नाराजांसाठीही गळ लावून संपर्क व गोपनीय बैठका सुरू होत्या. भाजपने काही गटाच्या सामाजिक बैठकांद्वारे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातूनही काही तुल्यबळ उमेदवार पुढे आले आहेत. यामुळे मतांचे समिकरण जमविताना काही दिग्गजांच्या उमेदवारीला कात्री लावण्यावर खल सुरू होता.

शिवसेना, जिल्हा सुधार समिती-आप यांनीही आपापल्या उमेदवार निश्‍चितीसह अर्ज भरण्यासाठी व्यूहरचना केली होती. या सर्वांतून काही इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी रविवारी अपक्ष, पक्षांचे अर्ज ऑनलाईन भरले.  यातून उमेदवारी न मिळाल्यास तत्काळ थेट अन्य पक्षांची उमेदवारी किंवा पुरस्कृतच्याही खेळी करण्याची व्यूहरचना होती. दरम्यान, प्रशासनानेही सोमवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांकडून खबरदारी

काँग्रेस-राष्ट्रवादीने बंडखोरी टाळण्यासाठी जागावाटपाचा फेरा सुरूच ठेवत कमालीची खबरदारी घेतली होती. कोणत्याही स्थितीत भाजपला संधी द्यायची नाही, असा यामागे दोन्ही पक्षांचा सूर होता. यासाठी स्वतंत्र लढल्यास किंवा थेट लढल्यास काय होईल, याचीही चाचपणी शेवटपर्यंत होती. भाजपकडूनही जुन्या-नव्यांचा वाद आणि नव्याने आयात होणार्‍यांचा ताळमेळ घालत सक्षम उमेदवारीसाठी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे सर्वच पक्षांनी सोमवारी शेवटच्या क्षणी याद्या जाहीर करण्याचे ठरविले.