Mon, May 20, 2019 20:25होमपेज › Sangli › ‘त्या’ मुलाचा अर्धाच मृतदेह सापडला

‘त्या’ मुलाचा अर्धाच मृतदेह सापडला

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 23 2018 12:26AMसांगली : प्रतिनिधी

ब्रम्हनाळमध्ये मगरीने ओढून नेलेले सागर सिद्धू डंकनवार (वय 14, रा. हिडकल, ता. रायबाग) याचा अर्धाच मृतदेह रविवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास कसबे डिग्रजजवळ सापडला. शुक्रवारी सायंकाळी मगरीने नदीकाठावर बसलेल्या सागरला ओढून नेले होते. गेले दोन दिवस त्याचा शोध सुरू होता. रविवारी सकाळी कसबे डिग्रजजवळ त्याचा अर्धाच मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. 

ब्रम्हनाळ येथे मामाकडे सुटीसाठी सागर आला होता. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो मामासोबत कृष्णा नदीच्या काठावर गेला होता. काठावर तो बसला असता अचानक मगरीने झडप घालून त्याला पाण्यात ओढून नेले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून कृष्णानदीपात्रात त्याचा शोध सुरू होता. 

चार बोटींच्या मदतीने ग्रामस्थ व वन खात्याचे कर्मचारी दिवसभर शोध घेत होते. पलूस, कडेगाव, सांगली वन विभाग परिक्षेत्र  व वन खात्याचे फिरते पथकातील अधिकारी व कर्मचारी शोधमोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान, पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

ज्या ठिकाणाहून सागरला ओढून नेले तेथून एक किलोमीटर परिसरात शोध घेण्यात येत होता. घटना घडून चोवीस तास उलटले तरी  सागरचा मृतदेह सापडत नव्हता. त्याचे आई-वडील, मामा व नातेवाईक डोळ्यात जीव आणून नदीकाठी बसून होते. रविवारी सकाळी सांगलीतील आयुष हेल्पलाईनच्या टीमने पुन्हा शोध सुरू केला. सकाळी पावणेबाराच्या सुमारास कसबे डिग्रजजवळ पाण्यावर तरंगताना त्याचा मृतदेह आढळला. तो बाहेर काढल्यानंतर कमरेच्या वरचाच भाग फक्‍त असल्याचे निदर्शनास आले. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी नातेवाईक मृतदेह घेऊन हिडकलकडे रवाना झाले. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

वनखात्याला पेट्रोलही ग्रामपंचायतीने दिले

सागरच्या शोधावेळी वनखात्याची यंत्रणा सक्षम नसल्याचे दिसून आले. अगदी बोटींमध्ये भरण्यासाठी पेट्रोलही ब्रम्हनाळ ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले होते. नावालाच हजर असलेल्या निष्क्रीय वनखात्याविषयी ग्रामस्थांमधून संताप व्यक्‍त करण्यात आला.    

Tags : sangli, Half of the body,  found, Kasbe Digraj, sangli news,