Fri, Jul 19, 2019 07:43होमपेज › Sangli › बारावीचा निकाल 90.12 टक्के

बारावीचा निकाल 90.12 टक्के

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 11:57PMसांगली : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. सांगली जिल्ह्याचा निकाल 90.12 टक्के  आहे. 32 हजार 37 विद्यार्थी उत्तीर्ण, तर 3 हजार 511 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 27 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचा टक्‍का 95.40, तर मुलांचा टक्‍का 85.93 आहे. ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेमध्ये गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थी व पालकांनी मोबाईलवरून निकाल पाहिला. 

बारावी परीक्षेला सांगली जिल्ह्यातून 35 हजार 579 परीक्षार्थींची नोंदणी झाली होती. त्यापैकी 35 हजार 548 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.  32 हजार 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये शास्त्र शाखेचे विद्यार्थी 97.48 टक्के, कला शाखा 78.81 टक्के, वाणिज्य 93.18 टक्के, तर व्होकेशनलचा निकाल 86.50 टक्के लागला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 90.12 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 91.50 टक्के, तर सातारा जिल्ह्याचा निकाल 91.14 टक्के लागला आहे. 

बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. जिल्ह्यात 19 हजार 801 मुलांपैकी 17 हजार 15 मुले उत्तीर्ण झाली असून हे प्रमाण 85.93 टक्के आहे. जिल्ह्यात 15 हजार 747 मुलींपैकी 15 हजार 22 मुली उत्तीर्ण झाल्या असून हे प्रमाण 95.40 टक्के आहे. 

एक रिपीटर विशेष श्रेणीत पास; 857 विद्यार्थी पुन्हा नापास

जिल्ह्यातून बारावीसाठी 1 हजार 241 रिपीटर विद्यार्थी (पुर्नपरीक्षार्थी) बसले होते. त्यापैकी 384 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण 30.94  टक्के आहे. शास्त्र शाखेकडील एका रिपीटर विद्यार्थ्यांस विशेष श्रेणी मिळाली आहे. 29 विद्यार्थी प्रथम श्रेणी तर 51 विद्यार्थ्यांना व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.  दरम्यान रिपीटरपैकी 857 विद्यार्थी पुन्हा नापास झाले आहेत. 

जिल्ह्यात पलूस तालुका अव्वल  

जिल्ह्यात पलूस तालुक्याचा  सर्वाधिक 94.37 टक्के, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी 85.35 टक्के निकाल लागला आहे. आटपाडी तालुका 93.01, जत 89.74, कडेगाव 92.53, खानापूर 92.70, मिरज 92.21, सांगली शहर 89, शिराळा 89.43, तासगाव 91.74 आणि वाळवा तालुक्याचा 88.15 टक्के निकाल लागला आहे. शंभर टक्के निकालाच्या शाळाजिल्ह्यात 27 उच्च माध्यमिक शाळांचा बारावी परीक्षेच्या निकाल 100 टक्के लागला. अंजनीतील आर. आर. आबा पाटील विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज या एकमेव कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचा निकाल 100 टक्के लागला आहे. लोणारी गुरुकुल आटपाडी, राजारामबापू हायस्कूल आटपाडी, गणपतराव मोरे दिघंची, दुधाळ उच्च माध्यमिक (जत), महांकाली कवठेमहांकाळ, नूतन हायस्कूल लांडगेवाडी, अंबिका  कवठेमहांकाळ, चव्हाण कन्या विद्यालय खानापूर, नवीन मराठी माध्यमिक स्कूल विटा, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी, नवकृष्णा हायस्कूल कुपवाड, पंडित नेहरु विद्यालय कवलापूर, ए. ए. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड, किर्लोस्कर हायस्कूल किलोस्करवाडी, अभिजित कदम प्रशाला पलूस, गुरुकुल विद्यानिकेतन पलूस, रजपुत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स सांगली, शहा महिला महाविद्यालय सांगली, गुरुदेव दादोजी कोंडदेव सैनिक शाळा तासगाव, एस. एस. माने-पाटील विद्यामंदिर विसापूर, अ‍ॅॅड. आर. आर. पाटील ज्युनिअर कॉलेज, सिद्धनाथ हायस्कूल आरवडे, अण्णासाहेब डांगे ज्युनिअर आष्टा, सागर पाटील ज्युनिअर कॉलेज ढवळी, राजारामबापू पाटील कॉलेज साखराळे, विश्वसेवा ज्युनिअर ऐतवडे खुर्द आणि के. बी. पाटील उच्च माध्यमिक ऐतवडे बुद्रुक यांचा निकाल 100 टक्के लागला आहे.