Sat, Apr 20, 2019 10:35होमपेज › Sangli › आरोपीच्या अटकेसाठी आटपाडीत मोर्चा

आरोपीच्या अटकेसाठी आटपाडीत मोर्चा

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 9:05PMआटपाडी : प्रतिनिधी

गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील बालिकेच्या खुनाचा उलगडा करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांचा निषेध करत गुरुवारी विविध संघटनांच्यावतीने आटपाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सोमवारी (दि.29) आटपाडी शहर व तालुका बंद पुकारण्यात आला आहे.

गळवेवाडी येथील प्रतीक्षा दादासाहेब गळवे या मुलीचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेला 11 दिवस झाले तरी अद्याप पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या लोणारी समाजाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून पोलिसांचा निषेध केला.  

आरोपीला तात्काळ अटक करावी, त्यांना सहकार्य करणार्‍यांना सहआरोपी करून गुन्हे दाखल करावेत, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, पीडित मुलीच्या कुटुंबियांना 20 लाखाची मदत द्यावी, गुन्ह्याचा तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांच्या निषेधार्थ 29 रोजी आटपाडी शहर व तालुका बंदची हाक देण्यात आली. निवेदनाची दखल न घेतल्यास सांगली व राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

लोणारी समाज जिल्हाध्यक्ष अभिमन्यू क्षीरसागर, बळीराजा संघटनेचे बी. जी. पाटील, लोणारी युवा प्रतिष्ठानचे दैवत काळे, परमेश्‍वर नरळे, आप्पासाहेब करचे, दिनकर करांडे, हणमंत करांडे, मोहन खरात, कैलास गळवे, नवनाथ रानगट, कमलाताई हारगे, संतोष करांडे, पोपट आटपाडकर, अर्जुन गौंड, कैलास गळवे, प्रतीक्षाचे आई-वडील या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देण्यात आले.