Sat, Jul 20, 2019 08:57होमपेज › Sangli › ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करा

ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करा

Published On: Sep 21 2018 1:17AM | Last Updated: Sep 20 2018 11:46PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्याचा सर्वांगीण   विकास व्हावा यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करा. तीत   सर्व लोकप्रतिनिधींसह लोकांचाही सहभाग असावा. यातून   पर्यटनक्षेत्र आणि धार्मिक स्थळांचा विकास होईल. हळद, बेदाणा, कला, क्रीडा, साहित्य अशा अनेक क्षेत्रांचे ब्रँडिंग होईल, असे प्रतिपादन   पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात   प्रादेशिक पर्यटन विकास आढावा बैठकीत  ते बोलत होते.   कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत,  महापालिकेचे आयुक्त रविंद्र खेबुडकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे आदि उपस्थित होते. 

ना. देशमुख म्हणाले,   जिल्ह्यात क वर्ग मान्यताप्राप्त 50 पर्यटनस्थळे आहेत. यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आठ वन पर्यटन स्थळांना 1 कोटी 10 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे.  इतर पर्यटन स्थळांसाठी 2 कोटी 25 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. ही कामे दर्जेदार करावीत.  

ना. देशमुख म्हणाले, चांदोली येथे पर्यटकांसाठी चांगली निवास व्यवस्था, बोटिंग सुविधा, अंतर्गत रस्ते, सर्पोद्यान, मत्स्यालय होण्यासाठी प्रयत्न करू.   महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांचा समन्वय साधून तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील. 

औदुंबर आणि परिसरात कृष्णा नदीत मगरींचा वावर आहे. तिथे  पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने   कुंपण घालण्याची कार्यवाही   तीन 
महिन्यात पूर्ण करावी. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वॉटर ए. टी. एम. बसवताना प्रमाणित निकष अंमलात आणावेत. पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे.  पेड प्रादेशिक पर्यटन केंद्राच्या ठिकाणी रस्ते  बांधकाम करावे.