Sat, May 30, 2020 01:06होमपेज › Sangli › पूरबाधित चोवीस गावे दत्तक घेणार

पूरबाधित चोवीस गावे दत्तक घेणार

Published On: Aug 14 2019 12:08AM | Last Updated: Aug 14 2019 12:08AM
सांगली  : प्रतिनिधी 

कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगलीसह जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे. या आपत्तीतून सावरण्यासाठी फटका बसलेल्यांना पहिल्या टप्प्यात रोख पाच हजार रुपये देण्यात येत आहेत. बाधित झालेली 24 गावे दत्तक घेण्यात येत आहेत, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आदी उपस्थित होते. 

मंत्री देशमुख म्हणाले, पुराचे  पाणी आता ओसरत  असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पूरग्रस्तांना शासनातर्फे मदत देण्यात येत आहे. पाच हजार रोख दिल्यानंतर इतर मदत मात्र बँक खात्यांवर देण्यात येणार आहे. त्याशिवाय विविध कंपन्या, संस्था 

यांच्यामार्फत बाधित गावेही दत्तक घेण्यात येत आहेत.  आतापर्यंत 24 गावे दत्तक घेण्यात आली आहेत.  पंढरपूर येथील मंदीर समितीने पाच, सांगली बाजार समितीने दोन, मुंबई बाजार समितीने एक , अशा पद्धतीने ही गावे दत्तक घेतली आहेत. कंपन्यांची मदत घेऊन इतर गावेही दत्तक घेण्यात येणार आहेत. 

ते म्हणाले, पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आवश्यक असेल त्याप्रमाणे मदतीचे नियोजन करण्यात येत आहे. भाडेकरूंनाही मदत देण्यात येईल. व्यापार्‍यांचेही विविध प्रश्न आहेत. ते प्रश्नही सोडवण्यात येतील. कोणालाही वार्‍यावर सोडले जाणार नाही. शहरासह जिल्ह्यात तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत.