Tue, Mar 26, 2019 11:47



होमपेज › Sangli › दूध आंदोलन सरकारला अडचणीत आणण्यासाठी

दूध आंदोलन सरकारला अडचणीत आणण्यासाठी

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 16 2018 12:21AM



सांगली : प्रतिनिधी

शेतकर्‍यांची कणव दाखविणार्‍या तथाकथित नेत्यांनी दूध आंदोलन केवळ सरकारला अडचणीत आणण्यासाठी सुरू केले आहे, असा टोला पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार बैठकीत लगावला. सरकार दूध उत्पादकांना दरवाढ देण्यासाठी विचाराधीन आहे. पण, त्यासाठी दूध अडविणे, दूध रस्त्यावर ओतून उत्पादकांचे नुकसान करू नये, असेही ते म्हणाले.

देशमुख म्हणाले, भाजप सरकारने शेतकरी, दूध उत्पादकांसाठी जेवढे केले, तेवढे आतापर्यंत कोणत्याच सरकारने केले नाही. शेतकरी कर्जमाफीपासून ते शेतकर्‍यांना उभे करण्यासाठी सरकारने विविध योजन आणल्या. दूध उत्पादकांसाठीही सरकार सकारात्मकच आहे. त्यासाठीच दूध पावडर निर्यातीला 50 रुपये अनुदान दिले आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांनाही 3 रुपये अनुदान देण्यासाठी सरकार विचार करीत आहे. 

ते म्हणाले, परंतु दूधसंस्था या ज्या राजकारण्यांच्या आहेत त्यांच्याकडून शेतकर्‍यांना भाव मिळत नाही. त्याचा मलिदा कोण खाते हे उघड आहे. त्यामुळे जनतेला दर मिळणार कसा? उलट तेच दुधाचे राजकारण करून आता अशा आंदोलनाला चिथावणी देत आहेत. त्यामुळे सरकारच आता अशा दूध संस्थांना पर्याय उभे करून शेतकर्‍यांना चांगला दर मिळेल अशी व्यवस्था करेल.

ते म्हणाले, दूध दरासाठी आता शेतकर्‍यांच्या नेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तोडफोड, दुधाची नासाडी सुरू झाली आहे. ते दूध रस्त्यावर ओतून नासाडी करू नये. गोरगरीब, झोपडपट्टी धारकांच्या मुखात जावू द्या. शिवाय शहरातील दूध अडवून काय मिळणार आहे? त्यापेक्षा तुम्ही हे दूध फुकट वाटावे. दरासाठी आंदोलन जरूर करावे.