Fri, Sep 21, 2018 11:25



होमपेज › Sangli › दुधाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्या : शेतकर्‍यांची मागणी

दुधाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्या : शेतकर्‍यांची मागणी

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 9:04PM



पलूस : प्रतिनिधी   

खासगी आणि सहकारी दूध संघांनी गेल्या चार महिन्यांपासून दुधाचा खरेदी दर कमी केला आहे. प्रतिलिटर 26 रुपयांचा खरेदी दर आज 18 रुपयांवर आला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यासाठी शासनाने  उत्पादन खर्चावर आधारित  दुधाला   हमीभाव ठरवून देण्याची मागणी आता शेतकर्‍यांतून होतआहे.     

पलूस तालुका दूध उत्पादक शेतकरी संघाने दूध दराबाबत सुरू असलेल्या मनमानीपणाबाबत  विचारविनीमय करुन  याबाबतच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी  शेतकर्‍यांची, दूधउत्पादकांची बैठक बोलावली होती. यावेळी उत्पादनखर्चावर आधारित दुधाला दर देण्याची मागणी करण्यात सर्वांनुमते करण्यात आली.  आता सहकारी आणि खासगी दूध संघांवर शासनाचा अंकुश  राहिलेला  नसल्याने संघाची मनमानी सुरू असल्याची टीका करण्यात येत  आहे.

शासनाने दुधाच्या भुकटीला आणि निर्यात दुधाला अनुदान देण्याचा  घेतलेला निर्णय शेतकर्‍यांच्या  फारसा उपयोगाचा नाही, कारण पलूस तालुक्यातून एकही लिटर दूध निर्यात होत नाही. ही शेतकर्‍यांची केवळ दिशाभूल आहे.  शेतकर्‍यांचे लक्ष विचलीत करण्याचा हा प्रकार आहे. यापुढे संघाच्या आणि शासनाच्या धोरणाविरोधांत तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शेतकर्‍यांनी दिला.दूध उत्पादन करण्यासाठी गायीला  सुका चारा, ओला चारा, पेंड, औषधे आणि इतर खर्च गृहित धरता सरासरी 31 ते 32 रुपये प्रतिलिटर उत्पादन खर्च येत असून प्रतिलिटर दहा -बारा  ते चौदा रुपयांचा तोटा दररोज सहन करावा लागत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. या बैठकीत भीमराव साळुंखे, राजेंद्र पाटील, सूर्यकांत मोरे, शिवाजी पाटील, समीर शिंदे, उल्हास पाटील, प्रताप देसाई, संजय माळी, राहुल लोकरे यांनी भावना व्यक्‍त करीत  आपल्या दुधाला रास्त भाव मिळवण्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहन केले.